पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर येणार वर्गोन्नत शेरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:20 IST2021-05-06T04:20:34+5:302021-05-06T04:20:34+5:30
कोरोनामुळे शिक्षण व्यवस्था प्रभावित झालेली आहे. कोरोना काळात परीक्षा घेणे शक्य नाही. शालेय शिक्षणमंत्र्यांनी ६ एप्रिल रोजी पहिली ते ...

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर येणार वर्गोन्नत शेरा !
कोरोनामुळे शिक्षण व्यवस्था प्रभावित झालेली आहे. कोरोना काळात परीक्षा घेणे शक्य नाही. शालेय शिक्षणमंत्र्यांनी ६ एप्रिल रोजी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विद्यार्थ्यांबाबत नेमकी कार्यवाही कशी करावी याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यंदा कोरोनाच्या कारणामुळे पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होऊ शकले नाहीत. ज्या विद्यार्थ्यांचे संकलित मूल्यमापन करता आले नाही त्यांना आरटीई कायद्याच्या कलम १६ नुसार पुढच्या वर्गात वर्गोन्नत करण्यात येणार आहे. मात्र, त्यांच्या प्रगतीपुस्तकावर आरटीई ॲक्ट २००९ कलम १६ नुसार वर्गोन्नत असा शेरा राहणार आहे. राज्यात पाचवी ते आठवीच्या शाळा १५ दिवसांसाठी सुरू करण्यात आल्या होत्या, तर अनेक ठिकाणी पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. अशा विद्यार्थ्यांचे शाळांकडून संकलित मूल्यमापन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाची संपादन क्षमता लक्षात घेऊन त्याचे रूपांतर १०० गुणांमध्ये करण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांची श्रेणी निर्धारित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विशेष प्रशिक्षण आयोजित...
यंदा ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता, पुढच्या वर्गात पाठविण्यात येणार आहे. त्यांचा अभ्यास मागे पडण्याची भीती आहे. त्यामुळे पुढील सत्राच्या सुरुवातीलाच शाळेत विशेष प्रशिक्षण आयोजित करण्याचे निर्देशही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिले आहेत. त्यात विद्यार्थी मित्र या पुस्तिकेचा आधार घेऊन नियमित वर्ग अध्यापन करण्याचेही निर्देश आहेत. यंदाचे नुकसान भरून काढण्यासाठी कृती कार्यक्रम आखण्यात येणार आहे. कोट कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना उत्तीर्ण घोषित करून गुणपत्रिकेवर वर्गोन्नत शेरा देण्याबाबत सूचना आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
पहिलीतील विद्यार्थी ४६७७८
दुसरीतील विद्यार्थी ४६७३३
तिसरीतील विद्यार्थी ५६६२१
चौथीतील विद्यार्थी ४७६९९
मुले घरात कंटाळली...
मागील वर्षापासून शाळेला सुटी आहे. त्यामुळे घरात राहून कंटाळा येत आहे; परंतु कोरोनामुळे नाइलाज आहे. - सर्वज्ञ नागुरे
शाळेला सुटी असल्याने घरात मोबाइल खेळणे, टीव्ही पाहणेही आता कंटाळवाणे वाटत आहे. शाळेतील मजा काही औरच असते. - आंशिका पेन्सलवार.
शाळा बंद असल्याने ऑनलाइन पद्धतीने अभ्यास केला. एका वर्षापासून घरीच असल्याने शाळेची आठवण येत आहे. सुट्यांमुळे कंटाळवाणे वाटते. - समर्थ बुड्डे.