शामदादा आकनगिरे प्रतिष्ठानच्या वतीने वैकुंठरथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:20 IST2021-04-28T04:20:55+5:302021-04-28T04:20:55+5:30
रेणापूर शहराचा विस्तार वाढला आहे. वस्ती वाढल्याने सार्वजनिक स्मशानभूमी ही लोकवस्तीपासून ३ ते ४ किमी अंतरापर्यंत झाली आहे. शहरातील ...

शामदादा आकनगिरे प्रतिष्ठानच्या वतीने वैकुंठरथ
रेणापूर शहराचा विस्तार वाढला आहे. वस्ती वाढल्याने सार्वजनिक स्मशानभूमी ही लोकवस्तीपासून ३ ते ४ किमी अंतरापर्यंत झाली आहे. शहरातील एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी येथील रेणा नदीच्या काठी असलेल्या सार्वजनिक स्मशानभूमीत घेऊन जावे लागते. ही स्मशानभूमी दूर असल्याने मृतदेह घेऊन जाणे अथवा अंत्ययात्रा काढण्यासाठी लातूरहून वैकुंठरथाची मागणी करावी लागत आहे. तसेच पिंपळ फाट्यापासून स्मशानभूमीपर्यंतचे हे अंतर जास्त असल्याने नातेवाईकांना खूप कसरत करावी लागत होती.
त्यामुळे शहरासाठी एक वैकुंठरथ उपलब्ध करावा, अशी मागणी होत होती. ही मागणी लक्षात घेऊन येथील नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत पुढाकार घेऊन रेणापुरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते स्व. शामदादा आकनगिरे प्रतिष्ठानच्या वतीने रेणापूरकरांसाठी वैकुंठरथ उपलब्ध करून दिला आहे.
वैकुंठरथ मोफत मिळणार...
मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लातूरहून पैसे देऊन वैकुंठरथ मागवावा लागत असे. नागरिकांना उन्हात तसेच पावसात त्रास होत असे. आता रेणापुरातच वैकुंठरथ उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे होणारा त्रास कमी झाला आहे. हा वैकुंठरथ रेणापूरवासीयांसाठी मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे उपनगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांनी सांगितले.