प्राथमिक आरोग्य केंद्रात आजपासून लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:19 IST2021-03-08T04:19:36+5:302021-03-08T04:19:36+5:30
६० वर्षे व त्यापुढील ज्येष्ठांना तसेच ४५ ते ५९ वर्षे वयोगटांतील दुर्धर आजार असलेल्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लस देण्यास गत ...

प्राथमिक आरोग्य केंद्रात आजपासून लसीकरण
६० वर्षे व त्यापुढील ज्येष्ठांना तसेच ४५ ते ५९ वर्षे वयोगटांतील दुर्धर आजार असलेल्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लस देण्यास गत सोमवारपासून सुरुवात झाली आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेसह उदगीर, निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात तसेच रेणापूर, अहमदपूर, मुरुड, बाभळगाव, औसा, देवणी, जळकोट येथील ग्रामीण रुग्णालयात आणि शिरुर अनंतपाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. याशिवाय, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या १२ रुग्णालयांतही लसीकरण सुरू झाले आहे. खासगी रुग्णालयातील केंद्रात लसीसाठी २५० रुपये शुल्क आहे.
दरम्यान, मोफत लसीकरणाची सुविधा वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास सोमवारपासून प्रारंभ होत आहे. या केंद्रात ज्येष्ठ नागरिक, ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील आजारी, पूर्वी नोंदणी केलेले व लस घेतलेले फ्रंटलाईन तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनाही लस देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले.
प्रत्येक केंद्रात लस उपलब्ध...
जिल्ह्यात ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी तेथील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे तसेच प्रत्येक आरोग्य केंद्रास ५०० लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील ज्येष्ठांनी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.
४ हजार ३२४ ज्येष्ठांना लसीकरण...
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४ हजार ३२४ ज्येष्ठांना लसीकरण करण्यात आले आहे. त्यात वैद्यकीय विज्ञान संस्था ६७७, उदगीर उपजिल्हा रुग्णालयात ४१८, निलंगा उपजिल्हा रुग्णालय ८६, औसा ग्रामीण रुग्णालय १४१, अहमदपूर- ५९३, मुरुड- १७२, चाकूर- ११५, देवणी- ४४, जळकोट- १११, रेणापूर- ७५, बाभळगाव- ९१, किल्लारी २८, तसेच शिरुर अनंतपाळ आरोग्य केंद्र १३८, बोरी- ३५, किनगाव ७५, शिरुर ताजबंद आरोग्य केंद्रात १२ व अन्य खासगी रुग्णालयात ज्येष्ठांना लसीकरण करण्यात आले आहे तसेच ४५ ते ५९ वयोगटांतील ४३४ जणांना लस देण्यात आली आहे.