आरोग्य उपकेंद्रातही लसीकरणाची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:13 IST2021-03-29T04:13:11+5:302021-03-29T04:13:11+5:30
लातूर : लसीकरण वाढविण्यासाठी आरोग्य प्रशासनाने लसीकरण केंद्रात वाढ केली आहे. उदगीर तालुक्यातील नागलगाव आणि मोघा आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाची ...

आरोग्य उपकेंद्रातही लसीकरणाची सोय
लातूर : लसीकरण वाढविण्यासाठी आरोग्य प्रशासनाने लसीकरण केंद्रात वाढ केली आहे. उदगीर तालुक्यातील नागलगाव आणि मोघा आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत किमान दोन उपकेंद्रांत लसीकरण केंद्र कार्यान्वित केले जाणार आहेत. जवळपास ८० नवीन लसीकरण केंद्रे करण्यात येतील, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी दिली.
जिल्ह्यात सद्य:स्थितीत आरोग्य कर्मचारी तसेच फ्रन्टलाइन कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या नागरिकांना लस देण्यात येत आहे. आतापर्यंत ७५ हजारांपेक्षा अधिक व्यक्तींनी लस घेतली आहे. हा पहिला डोस असून, १० हजारांच्या जवळपास लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. १ एप्रिलपासून पंचेचाळीस वर्षांपुढील सर्व व्यक्तींना लस दिली जाणार आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने लसीकरण केंद्रात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खाजगी मिळून ७७ केंद्रे कार्यान्वित होती. त्यात दोन केंद्रांची वाढ झाली आहे. पुढील आठवड्यामध्ये आरोग्य उपकेंद्रावर लस दिली जाणार आहे. ८० केंद्रे वाढविली जाणार आहेत. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या सूचनेनुसार केंद्रे वाढविण्यात येत असल्याचे डॉ. परगे यांनी सांगितले.