लसीकरणामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते : डॉ. शिवराज निळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:15 IST2021-05-31T04:15:55+5:302021-05-31T04:15:55+5:30
उदगीर : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीत वाढ होते, असे मत हंग जू चायनीज वैद्यकीय विद्यापीठ, ...

लसीकरणामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते : डॉ. शिवराज निळे
उदगीर : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीत वाढ होते, असे मत हंग जू चायनीज वैद्यकीय विद्यापीठ, चीन येथील डॉ. शिवराज निळे यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद, धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय आणि शिवाजी महाविद्यालय यांच्या विद्यमाने आयोजित कोविड-१९ महामारी जनजागरण अभियान सप्ताहांतर्गत ‘रोगप्रतिकारशक्ती व लसीकरण’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मराठी विज्ञान परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे सचिव डॉ. जयंत जोशी होते तर उद्घाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्र सिंग बिसेन उपस्थित होते. यावेळी लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सदाशिव शिंदे, उदगीरच्या शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शरद जगताप उपस्थित होते. हे व्याख्यान आभासी पद्धतीने घेण्यात आले.
यावेळी डॉ. निळे म्हणाले, लस घेतल्यानंतर प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार काही गोष्टी घडत असतात. त्यामुळे आपण वैद्यकीय सल्ल्यानुसार लस घ्यावी. आपल्या देशात मिळणारी लस सुरक्षित आहे. यावेळी डॉ. जोशी म्हणाले, विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार सामान्यांमध्ये होण्यासाठी हा अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे. नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी चांगला आहार आणि नियमित व्यायामही आवश्यक आहे. प्रास्ताविक उदगीर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. उर्मिला शिरसी यांनी केले. डॉ. अविनाश जाधव यांनी आभार मानले.