लातूर : ‘मागणी तसा पुरवठा’ होत नसल्याने लसीकरणाला जिल्ह्यात खिळ बसत आहे. त्यामुळेच १७१ पैकी ३४ केंद्रांवर मंगळवारी लसीकरणाचे काम ठप्प होते. केवळ १३७ केंद्रांवर लस देण्यात आली. मागील दोन-तीन दिवस तर पुरवठा ठप्प झाल्याने अनेक केंद्रे बंद होती. आता १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांनाच लस दिली जाणार असल्याने ती सक्षम पद्धतीने मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
४५ वर्षांपुढील ८ लाख ५१ हजार नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यात आतापर्यंत २ लाख ३२ हजार १५४ डोस दिले गेले आहेत. त्यातील पहिला डोस २ लाख ३ हजार ७२३ जणांनी घेतला आहे तर २८ हजार ४३१ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीचा पुरवठा सुरळीत आणि नियमित मागणीनुसार झाला असता तर टक्केवारी वाढली असती. परंतु, मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने २३ टक्के लसीकरण झाले आहे. उद्दिष्ट ८ लाख ५१ हजार पात्र लाभार्थ्यांचे असताना २ लाख ३ हजार ७२३ जणांनी पहिला डोस घेतला आहे. मागणीप्रमाणे लसीचा पुरवठा झाला तर पूर्ण क्षमतेने लसीकरण होणार आहे.
१ मे नंतरचे नियोजन काय...
१ मे पासून १८ वर्षांपुढील सर्वांनाच लस दिली जाणार आहे. त्यानुसार खासगी सेंटर वाढविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कोविन पोर्टलवर अर्ज घेण्यात येत आहेत. अर्जांची छाननी झाल्यानंतर संबंधित केंद्र चालकांना ट्रेनिंग दिले जाणार आहे.
लसीचा पुरवठा मागणीप्रमाणे झाला तर दररोज १५ ते २० हजार डोसेस देण्याची क्षमता यंत्रणेकडे आहे. दहा ग्रामीण रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय, ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र, २५२ उपकेंद्र आहेत. या सर्व संस्थांत लसीकरण देता येऊ शकेल.