कोविड सेंटरमध्ये पीपीई किटचा वापर घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:19 IST2021-05-13T04:19:29+5:302021-05-13T04:19:29+5:30
लातूर : मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परिणामी, कोविड केअर सेंटरमधील डाॅक्टर्स, परिचारिका, सेवक यांना अनेक तास ...

कोविड सेंटरमध्ये पीपीई किटचा वापर घटला
लातूर : मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परिणामी, कोविड केअर सेंटरमधील डाॅक्टर्स, परिचारिका, सेवक यांना अनेक तास सेवा द्यावी लागत आहे. वारंवार पीपीई किट घालण्यात जाणारा वेळ आणि त्यामुळे वाढणारी उष्णता, यामुळे पीपीई किटचा वापर शक्यतो टाळला जात असून, कोविड सेंटरमध्ये केवळ सौम्य लक्षणाचेच रुग्ण असल्याने एन-९५ मास्क आणि हँडग्लोजचा नियमित वापर करीत रुग्णांची देखभाल केली जात आहे.
कोरोनाबाधित रुग्णांपासून उपचार करणारे डाॅक्टर, परिचारिका, सेवक यांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी पीपीई किट घालून उपचार करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत; परंतु सध्या उन्हाळा असून, अर्धा तासही पीपीई किट घातले तर अंग घामाघूम होत आहे. त्याचप्रमाणे किट घालणे आणि काढणे यामध्ये बराच वेळ वाया जात आहे. एका वेळेत पीपीई किट वापरल्यानंतर ते फेकून द्यावे लागते. त्यामुळे दिवसातून किती वेळा पीपीई किट काढणार आणि घालणार, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडत आहे. दरम्यान, लक्षणे जास्त असलेल्या आणि इतर रुग्णालयांत नियमित पीपीई किटचा वापर केला जात आहे. कोविड केअर सेंटरमध्ये सौम्य लक्षणाचे रुग्ण असल्याने वापर कमी आहे.
मास्क आणि हँडग्लोजचा वापर केल्यास संसर्ग होत नाही. सध्या उन्हाचा त्रास आणि सौम्य लक्षणाचे रुग्ण असल्यामुळे पीपीई किटचा वापर बराच कमी झाला आहे; परंतु पीपीई किट वापरणे गरजेचे आहे.
- परिचारिका
दिवसातून किती वेळा पीपीई किट घालायचे आणि काढायचे, असा प्रश्न आहे. काही वेळ घातल्यानंतर अस्वस्थ वाटायला लागते. सध्या लक्षणे कमी असलेले रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे पीपीई किट घालण्याची आवश्यकता वाटत नाही. - सेवक
कोरोनाबाधित रुग्णाचा अंत्यसंस्कार करण्यासाठी सर्वजण पीपीई किट घालतात. महापालिकेच्या वतीनेही मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट पुरविले जातात. पीपीई किट काढून कर्मचाऱ्यांच्या अंगावर सॅनिटायझरचा फवारा मारला जातो. शहरात कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सात ते आठ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांची विशेष काळजी महापालिकेच्या वतीने घेतली जात असून, त्यांना सॅनिटायझर, मास्क आदी साहित्य पुरविले जात आहे. रुग्णांचा नातेवाईक असल्यास त्यालाही पीपीई किट दिले जाते.