मास्कच्या वापरामुळे चाकुरात क्षयरोगाचा आलेख उतरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST2021-06-04T04:16:26+5:302021-06-04T04:16:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चापोली : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चेहऱ्याला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे तसेच फिजिकल डिस्टन्सही राखले जात ...

The use of masks reduced the incidence of tuberculosis in Chakura | मास्कच्या वापरामुळे चाकुरात क्षयरोगाचा आलेख उतरला

मास्कच्या वापरामुळे चाकुरात क्षयरोगाचा आलेख उतरला

लोकमत न्यूज नेटवर्क

चापोली : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चेहऱ्याला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे तसेच फिजिकल डिस्टन्सही राखले जात आहे. त्यामुळे इतर संसर्गजन्य आजार रोखण्यास मदत झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात चाकूर तालुक्यात केवळ ९३ क्षयरोगी आढळले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी झाली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम राबवला जातो. या अंतर्गत आढळणाऱ्या क्षयरोगींवर उपचार केले जातात. चाकूर तालुक्यात सन २०१५पूर्वी अधिक क्षयरुग्ण आढळून येत होते. मात्र, सन २०१६पासून या संख्येत घट झाली आहे. क्षयरोगींना निक्षय पोर्टल अंतर्गत मासिक स्वयंपोषणासाठी ५०० रूपये पोषण आहार भत्ता शासनाकडून दिला जातो. लॉकडाऊनमध्येही ही रक्कम क्षयरुग्णांना देण्यात येत आहे. सन २०२०-२१मध्ये २ लाख ८४ हजार ५०० रुपये देण्यात आले आहेत. तसेच २०२०-२१मध्ये क्षयरुणांना डॉट्स देणाऱ्या आशा कार्यकर्त्यांना ५२ हजारांचे मानधन वितरीत करण्यात आले आहे.

दरम्यान, खासगी डॉक्टरांकडे क्षयरुग्ण अधिक प्रमाणात उपचार घेतात. क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी डॉक्टरांनी सदरील माहिती दिल्यास त्यांना ५०० रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूद आहे.

५ महिन्यांत २७ रुग्ण आढळले...

चाकूर तालुक्यात २०१८मध्ये १२६ क्षयरुग्ण आढळले होते. २०१९मध्ये १३९, २०२०मध्ये ९३ क्षयरुग्ण आढळले. दि. १ जानेवारी ते २५ मे या कालावधीत २७ जणांना क्षयरोगाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सन २०१८पासून रुग्णांना वेळेवर दिली जाणारी औषधे आणि योग्य उपचारांमुळे रुग्णांच्या संख्येत घट झाली असल्याची माहिती चाकूरच्या क्षयरोग विभागाकडून देण्यात आली.

मृत्यूदरही झाला कमी...

चाकूर तालुक्यात २०१८मध्ये ६ क्षयरुग्णांचा मृत्यू झाला होता. २०१९मध्ये ५, २०२०मध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. दि. १ जानेवारी ते २५ मे या कालावधीत क्षयरोगामुळे एकही मृत्यू झालेला नाही.

मास्कच्या वापरामुळे रुग्ण घटले...

कोरोनाप्रमाणेच क्षयरोग अथवा टीबी हा आजार संसर्गजन्य आहे. या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्स राखणे, मास्कचा वापर महत्त्वाचा आहे. वर्षभरापासून नागरिक मास्कचा वापर करत आहेत. त्यामुळे क्षयरोगाच्या संसर्गाचा धोकाही कमी झाला आहे, अशी माहिती चाकूरचे क्षयरोग तालुका पर्यवेक्षक जी. डी. ओपळकर यांनी दिली.

Web Title: The use of masks reduced the incidence of tuberculosis in Chakura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.