अहमदपूर शहरातील व्यापाऱ्यांत अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:20 IST2021-04-08T04:20:26+5:302021-04-08T04:20:26+5:30
अहमदपूर शहरात दिवसभर अंशतः लॉकडाऊनची चर्चा होताना दिसत होती. प्रशासनाने कडक धोरण अवलंबत लॉकडाऊन केलाच, तर रोजीरोटीचा प्रश्न सोडवायचा ...

अहमदपूर शहरातील व्यापाऱ्यांत अस्वस्थता
अहमदपूर शहरात दिवसभर अंशतः लॉकडाऊनची चर्चा होताना दिसत होती. प्रशासनाने कडक धोरण अवलंबत लॉकडाऊन केलाच, तर रोजीरोटीचा प्रश्न सोडवायचा कसा, अशी समस्या आता समोर येणार आहे. अत्यावश्यक बाबींमध्ये किराणा, भाजीपाला, दवाखाने, औषधी दुकाने यांचा समावेश असला, तरी अन्य सर्व प्रकारची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतल्याने सदर दुकानदारांना आता पुन्हा २५ दिवसांच्या कालावधीमध्ये जगावे कसे, असाच प्रश्न निर्माण झाला आहे. हॉटेल व्यवसायात सर्वाधिक भीतीचे चित्र तयार झाले आहे. रात्री आठपर्यंतच पार्सल सुविधा असल्याने, यामध्येही समस्या निर्माण होणार आहेत. केश कर्तनालयधारकांनाही या निमित्ताने पुन्हा एकदा उपासमारीला सामोरे जावे लागणार आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून या व्यावसायिकांवर बंधने आली आहेत. मध्यंतरी सर्व सुरळीत झाल्यानंतरही केश कर्तनालये सुरू होण्यास फार वेळ लागला होता. आता पुन्हा ही दुकाने बंद राहणार असल्याने यातील लोकांनी काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अहमदपूर शहरातील अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान, तसेच भाजीपाला, दवाखाने, औषध दुकाने या उत्पादकांना यामध्ये सूट मिळाली असली, तरी या ठिकाणी होणारी गर्दी नियंत्रण आणायची कशी, असाही प्रश्न उपस्थित हाेत आहे. सार्वजनिक वाहतुकीसह खासगी वाहतुकीलाही परवानगी असल्याने शहरात येणारे लोंढे थांबणार नाहीत. त्यामुळे यातील दुकानांमध्ये होणारी गर्दी टाळणार कशी, अशी विचारणा बंद होणाऱ्या दुकानदारांकडून विचारली जात आहे, याचीच शहरात चर्चा होताना दिसत आहे.
रात्रीची संचारबंदी ही लागू केली असून, यामध्ये अत्यावश्यकसेवा वगळता, अन्य कुणालाही रस्त्यावरून प्रवास करता येणार नाही, शिवाय दिवसा जमावबंदी लागू होणार असल्याने पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. त्यामुळे याची अंमलबजावणी करतानाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. जी दुकाने सुरू राहणार आहेत, त्या ठिकाणी होणारी गर्दीच ही जमावबंदीचे उल्लंघन करणारी ठरू शकते. अशी चर्चाही व्यापारी वर्गातून होताना दिसत आहे. बंद असलेल्या दुकानधारकांनाही खर्च पेलवताना अनेक अडचणी येणार असून, इमारत भाडे, वीजबिले, कामगारांचे पगार हे थांबणार नसून, दुकान बंद असले, तरी त्यांना त्यांचा पगार द्यावा लागणार आहे. त्यामुळे आम्ही काय करायचे, असा प्रश्न बंद दुकानदारासमाेर उभा ठाकला आहे.
आठवडी बाजार अडचणीत...
राज्य शासनाच्या नव्या ‘ब्रेक दी चेन’ अभियानात आठवडा समाप्तीला म्हणजे शनिवार, रविवारी पूर्णतः लॉकडाऊन केले जाणार आहे. अहमदपूरचा आठवडी बाजार सोमवारी असतो. या बाजारासाठी तीन तालुक्यांतून अनेक व्यापारी येतात. यात लाखो रुपयांची उलाढाल होते, तर याच दिवशी जनावरांचा बाजारही भरतो. यातून हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह होत असतो. आता आठवडी बाजारच लॉकडाऊनमध्ये अडकल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.