Amit Deshmukh on Ravindra Chavan Controversy: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीमुळे वातावारण तापलेले असतानाच, लातूरच्या राजकीय रणांगणात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या संदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे लातूरमध्ये संतापाची लाट उसळली असून, काँग्रेस नेत्यांनी यावरुन संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे. विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांनीही रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.
महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपच्या वतीने लातूरमध्ये एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यकर्त्यांशी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. मात्र, हे करत असताना त्यांनी थेट लातूरचे लोकनेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विलासराव देशमुखांचा उल्लेख केला. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून या शहरातून विलासरावांचे नाव आणि त्यांच्या स्मृती पूर्णपणे पुसल्या जातील, असे विधान चव्हाणांनी केले. खरंतर आपल्या सर्वांचा उत्साह पाहिला तर लक्षात येतंय की, १०० टक्के विलासरावांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील, यात काही शंका नाही, असं चव्हाण म्हणाले. या विधानाचा व्हिडिओ समोर येताच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
चव्हाणांच्या या विधानामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. लातूरची ओळख विलासरावांमुळे आहे, अशा भावना व्यक्त करत काँग्रेसने भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. द्वेषाच्या राजकारणातून अशी विधाने केली जात असून, भाजप नेत्यांनी मर्यादा ओलांडली आहे, अशी टीका काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी उद्या लातूरमध्ये मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात आली असून चव्हाणांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेसने लावून धरली आहे.
अमित देशमुखांसह बड्या नेत्यांचा पलटवार
स्थानिक नेतेच नव्हे तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आणि विलासरावांचे पुत्र अमित देशमुख यांनीही या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. "भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये येऊन जे विधान केलंय त्यावरून, हा पक्ष कुठल्या स्तरावर राजकारणाला घेऊन चालला आहे हे दिसून येत आहे. हे दुर्दैवी आहे त्यांनी असे विधान करायला नको होते. लातूरची आणि महाराष्ट्राची ही संस्कृती नाही याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी होती. त्यांच्या विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रातूनही असाच निषेध होताना दिसत आहे," असं अमित देशमुख म्हणाले.
"विद्यमान राज्य सरकारच्या कार्यकाळात निवडणुकीच्या दरम्यान लोकांना धमकावणे, पैशाचे अमिष दाखवणे, एवढेच नव्हे तर उमेदवार पळवणे, त्यांच्या अपहरण करणे, खून , हिंसाचार घडवणे इथपर्यंतच्या घटना घडत आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी ओळख कधीच नव्हती, भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राची ही नवी ओळख निर्माण करू पाहतो आहे का? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे," असंही अमित देशमुख यांनी म्हटलं.
Web Summary : Amit Deshmukh condemns BJP leader Ravindra Chavan's remarks about erasing Vilasrao Deshmukh's memory from Latur. Chavan's statement ignited outrage, with Congress demanding an apology and calling for protests. Deshmukh criticized BJP's political tactics.
Web Summary : अमित देशमुख ने विलासराव देशमुख की स्मृति को लातूर से मिटाने संबंधी भाजपा नेता रवींद्र चव्हाण की टिप्पणी की निंदा की। चव्हाण के बयान से आक्रोश फैल गया, कांग्रेस ने माफी की मांग की और विरोध प्रदर्शन का आह्वान किया। देशमुख ने भाजपा की राजनीतिक रणनीति की आलोचना की।