उदगीरच्या वाहतुकीला शिस्त लागेना; कोंडीची समस्या कायम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:14 IST2021-06-30T04:14:00+5:302021-06-30T04:14:00+5:30
उदगीर : शहरातील वाहतुकीची समस्या काही केल्याने सुटत नसल्याचे चित्र आहे. दररोज चौकाचौकांत वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहनधारकांना मनस्ताप ...

उदगीरच्या वाहतुकीला शिस्त लागेना; कोंडीची समस्या कायम !
उदगीर : शहरातील वाहतुकीची समस्या काही केल्याने सुटत नसल्याचे चित्र आहे. दररोज चौकाचौकांत वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, बेशिस्त वाहनधारकांकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, वाहतुकीची कायमची कोंडी दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.
उदगीर शहराचा भौगोलिक विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे येथे वाहनांची मोठी संख्या आहे. वाढती लोकसंख्या व वाहनांमुळे शहरात वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. रोजच्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना आपला जीव मुठीत धरून कोंडीतूनच मार्ग काढावा लागत असून, उदगीर शहर व उपनगर असलेल्या निडेबन, मादलापूर, सोमनाथपूर, मलकापूर, लोणी येथील लोकसंख्या सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक आहे. त्यातच वाहनांची संख्याही वाढली आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी जीप, टमटम, ट्रॅव्हल्स यांचे थांबे बसस्थानकाच्या परिसरात भररस्त्यावर आहेत. तसेच शहरातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या परमिट व विनापरमिट ऑटोरिक्षांची संख्याही लक्षणीय आहे. या सर्व वाहनांबरोबरच तेलंगणामधील हैदराबाद ते नांदेड, लातूर ते देगलूर जाणारा मुख्य रस्ता शहरातूनच जातो. त्यामुळे अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. शेतकरी आपला भाजीपाला किरकोळ विक्रीस उदगीरला आणतात. त्यांना भाजीपाला विक्रीसाठी जागा उपलब्ध नसल्याने ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पंचायत समिती, तहसील कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात रस्त्यावरच आपले दुकान मांडतात. त्यातच अस्ताव्यस्त लावलेले ठेले, या ठिकाणी येणारे ग्राहक भररस्त्यातच त्यांची दुचाकी, चारचाकी वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. उदगीर शहरातील शिवाजी चौक, देगलूर रोडवरील येरोळकर हॉस्पिटल, बसस्थानक परिसर, दूध डेअरी परिसर, तहसील कार्यालय, जय जवान चौक, पत्तेवार चौक, उमा चौक, शाहू चौक, आदी भागांत रोज बेशिस्त वाहनांमुळे कोंडी निर्माण होत आहे. उदगीरातील वाहतुकीची कोंडी एक गंभीर समस्या बनलेली असताना ती सोडविण्यासाठी प्रशासन कुठलीही भूमिका घेत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन व महसूल विभाग यांनी एकत्रित येऊन कोंडी सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असून, याबाबत राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांना बैठक घेऊन सूचना केली होती; परंतु त्यानंतर काहीच उपाययोजना राबविल्या नसल्याचे चित्र आहे.
वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न
वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी बैठक घेतली होती. बैठकीत त्यांनी पोलीस प्रशासन, नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने एकत्रित या प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्याची सूचना केली होती; परंतु त्यानंतर कुठलीही कारवाई झालेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिका वाहतूक प्रश्नावर एकत्रित येत नसल्याने आमच्या कामावर मर्यादा पडत आहेत. तरही वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- गोरख दिवे, पोलीस निरीक्षक, उदगीर शहर
कोंडी सोडविण्यासाठी सिग्नल उभारणार
उदगीर शहरात लवकरच मुख्य चौकाच्या ठिकाणी सिग्नलची व्यवस्था करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपली वाहने रहदारीस अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी उभी करावीत. जेणेकरून आपल्याच जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- भारत राठोड, मुख्याधिकारी, उदगीर