उदगीरची शांतता भंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:18 IST2021-01-21T04:18:38+5:302021-01-21T04:18:38+5:30
पोलीस अधीक्षक पिंगळे म्हणाले, हैबतपूर येथील व्यक्तीला तोंडार येथे १३ जानेवारीच्या संध्याकाळी जबर मारहाण करण्यात आली हाेती. ...

उदगीरची शांतता भंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार
पोलीस अधीक्षक पिंगळे म्हणाले, हैबतपूर येथील व्यक्तीला तोंडार येथे १३ जानेवारीच्या संध्याकाळी जबर मारहाण करण्यात आली हाेती. यात सदरचा व्यक्ती गंभीर जखमी झाला. जखमीवर उदगीर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू हाेते. याची माहिती उदगीरच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली. यावेळी त्या दिवसापासून दररोज रुग्णालयात जाऊन जखमीचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, जखमीची अवस्था बाेलण्याच्या स्थितीत नव्हती. शेवटी १७ जानेवारी रोजी फिर्यादीचा भाऊ ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल हाेत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पहाटे आरोपीला पकडण्यास गेले असता ते उसामधून पळून गेले. मंगळवारी सकाळी जखमीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याचा गैरफायदा घेत काहींनी हा मृतदेह पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर घेऊन आले. उदगीर शहरात ठिकठिकाणी दगडफेक करण्यात आली. यामध्ये काही नागरिक जखमी झाले आहेत. हा प्रकार जाणीवपूर्वक केला असल्याचे समाेर आले आहे. यातून शहराची शांतता भंग होईल, असा प्रयत्न केला गेला आहे. भविष्यातील निवडणुका डाेळ्यासमाेर ठेवून हा प्रकार केल्याची शक्यता पाेलिसांनी वर्तविली आहे. हैबतपूर घटनेतील चारही अरोपींना अटक करण्यात आली आहे, असेही पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले.