उदगीरात प्लास्टिक साठ्यावर धाड; ७ लाखांचे प्लास्टिक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 19:07 IST2018-07-18T19:06:52+5:302018-07-18T19:07:51+5:30
प्लास्टिमुक्त शहरासाठी उदगीर नगर पालिकेच्या पथकाने बुधवारी प्लास्टिक साहित्याच्या साठ्यावर धाड टाकली़ त्यात सात लाखांचे प्लास्टिक जप्त करण्यात आले आणि १५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला़

उदगीरात प्लास्टिक साठ्यावर धाड; ७ लाखांचे प्लास्टिक जप्त
उदगीर ( लातूर ) : प्लास्टिमुक्त शहरासाठी उदगीर नगर पालिकेच्या पथकाने बुधवारी प्लास्टिक साहित्याच्या साठ्यावर धाड टाकली़ त्यात सात लाखांचे प्लास्टिक जप्त करण्यात आले आणि १५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला़
राज्य शासनाने लागू केलेल्या प्लास्टिकबंदीची उदगीर नगरपालिकेकडून जोरदार अंमलबजावणी करण्यात येत आहे़ बुधवारी पालिकेच्या पथकाने भरत वट्टमवार यांच्या दुकानी धाड टाकली़ त्यात प्लास्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या. यापूर्वी या ठिकाणी कारवाई करून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला होता़ दुसऱ्यांदा कारवाई करीत दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला़
याशिवाय, जुन्या भाजीपाला बाजार नजिकच्या भरत वट्टमवार यांच्या गोदामावरही बुधवारी धाड टाकण्यात आली़ त्यात सात लाखांचे प्लास्टिक जप्त करण्यात आले. गोदामाच्या दुसऱ्या मजल्यावर प्लास्टिक ग्लास, वाटी, पत्रावळी आदी साहित्य आढळून आले. हे साहित्य जप्त करण्यात येऊन पाच हजारांचा दंड आकारण्यात आला.
ही मोहीम नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक निरीक्षक सय्यद अतिक, अब्दुल रज्जाक यांनी केली. मोहिमेत शेख शकील, संजय बिरादार, मिर्झा अखिल बेग, अतुल गवारे, गंगाधर गवारे, मारोती शेकापूरे, अनिल कांबळे, शिवशांत शिंदे, लहू बलांडे आदी सहभागी झाले होते़
कारवाई सुरुच राहणाऱ़़
उदगीर नगरपालिका सातत्याने प्लास्टिक बंदीसाठी कारवाई करीत आहे़ बुधवारीच्या कारवाईत सात लाखांचे प्लास्टिक जप्त करण्यात आले़ व्यापारी व नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा, असे आवाहन नगर पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी केले़