सीबीएसईचे दोन हजार विद्यार्थी परीक्षा न देता होणार पास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:19 IST2021-04-18T04:19:10+5:302021-04-18T04:19:10+5:30

संदीप शिंदे, लातूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षा रद्द केली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील दोन हजार ...

Two thousand CBSE students will pass without taking exams! | सीबीएसईचे दोन हजार विद्यार्थी परीक्षा न देता होणार पास !

सीबीएसईचे दोन हजार विद्यार्थी परीक्षा न देता होणार पास !

संदीप शिंदे,

लातूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षा रद्द केली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील दोन हजार विद्यार्थी परीक्षेविनाच पास होणार आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केला असून, किमान ऑनलाईन पद्धतीने तरी परीक्षा घ्यायला हवी, असा सूर विद्यार्थी, पालकांमधून उमटत आहे.

लातूर जिल्ह्यात सीबीएसई अभ्यासक्रमाच्या जवळपास १७ शाळा आहेत. यातील दहावी वर्गात यंदाच्या वर्षात २ हजार विद्यार्थी असून, यामध्ये ११०० मुले, तर ९०० मुलींचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असून, राज्य शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मात्र, सीबीएसई बोर्डाने बारावीची परीक्षा पुढे ढकलून दहावीची परीक्षा चक्क रद्दच केली आहे. विद्यार्थ्यांना मूल्यमापनाद्वारे गुणांकन केले जाणार असले तरी त्याची पद्धत कशी असणार, पुढील शैक्षणिक वर्गात प्रवेश कसा घेणार असा सवाल पालक, विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, सीबीएसईच्या वतीने वर्षभर विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला असून, बोर्डाने किमान ऑनलाईन पद्धतीने तरी परीक्षा घ्यायला हवी होती. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीला न्याय मिळाला असता, असे मत पालकांनी व्यक्त केले.

सीबीएसईचे दहावीतील एकूण विद्यार्थी...

मुले - ११००

मुली - ९००

पालक म्हणतात...

दहावीचे वर्ष आयुष्याला कलाटणी देणारे असते. राज्य मंडळाने ज्याप्रमाणे परीक्षा पुढे ढकलल्या त्याच धर्तीवर सीबीएसई परीक्षा रद्द न करता पुढे ढकलण्याची गरज होती. विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केला असून, ग्रेड कसा ठरवणार, प्रवेश कोणत्या बेसवर देणार हा प्रश्न आहे. या निर्णयामुळे अभ्यासू विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.

- प्रा. भास्कर रेड्डी, पालक

विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे चार बाबींवर मूल्यमापन केले जाते. या बाबी लेखी परीक्षेशी अंतर्भूत असतात. मात्र, परीक्षा रद्दच करण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार हा प्रश्न आहे. किमान ऑनलाईन पद्धतीने तरी परीक्षा घ्यायला हवी होती. ज्यामुळे सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतेचा अंदाज आला असता. आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे जाण्यासाठी आवश्यक असलेली जिज्ञासा परीक्षेमधून दिसून आली असती. - धोंडिराम सुडे, पालक.

केंद्रीय बोर्डाने विद्यार्थ्यांची दर दोन महिन्याला ऑनलाईन परीक्षा घेतली असती तर मूल्यमापन करण्यास सुलभ गेले असते. त्यामुळे अंतिम निकाल परीक्षा न घेता समाधानकारक देता आला असता. मात्र, परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थी आणि पालकांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मार्गदर्शक सूचना जारी करून केंद्रीय बोर्डाने पालक, विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.- डॉ. मंगेश सेलूकर, पालक.

अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निक प्रवेश कसे होणार...

दहावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंडळाने घेतला असला तरी मूल्यमापन कसे होणार याबाबत सीबीएसईने मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या नाहीत. मूल्यमापन कसे करावे याबाबत लवकरच निर्णय सीबीएसई शाळांना कळविला जाणार आहे. त्यामुळे अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निक या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पूर्व परीक्षा घेणे हाच पर्याय असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

गुणदान समपातळीवर कसे आणणार...

सीबीएसईच्या वतीने वर्षभर ऑनलाईन अभ्यासक्रम घेण्यात आलेला आहे. शाळांच्या वतीने देण्यात येणाऱ्या २० गुणांची यादी बोर्डाकडे पाठविण्यात आली आहे. ८० मार्कांची लेखी परीक्षा होत असते. मात्र, परीक्षा रद्द झाल्याने ८० मार्क कसे द्यावेत, याबाबत केंद्रीय बोर्डाकडून शाळांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे गुण दान होणार असून, समपातळीवर आणण्यासाठी शाळा आणि सीबीएसई बोर्डाच्या वतीने योग्य खबरदारी घेतली जाणार आहे.

शिक्षणतज्ज्ञ प्रतिक्रिया...

देशभरात जवळपास २२ लाख विद्यार्थी सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षा देतात. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य हित लक्षात घेता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्षभरात शाळा आणि विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यामुळे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी पूर्ण झाली होती. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा पर्याय उपलब्ध होता. त्याचा अवलंब केला असता तर विद्यार्थ्यांना सोयीचे झाले असते. - प्राचार्य बी. ए. मैंदर्गे.

Web Title: Two thousand CBSE students will pass without taking exams!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.