जेसीबीच्या स्फोटात दोघे ठार, एकजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:20 IST2021-04-20T04:20:26+5:302021-04-20T04:20:26+5:30

प्रभाकर विनायक मुरकुटे (६३, रा. देवकरा, ता. अहमदपूर), बाबुराव पांडुरंग दहिफळे (६८, रा. कोळवाडी, ता. अहमदपूर) असे मृत झालेल्या ...

Two killed, one injured in JCB blast | जेसीबीच्या स्फोटात दोघे ठार, एकजण जखमी

जेसीबीच्या स्फोटात दोघे ठार, एकजण जखमी

प्रभाकर विनायक मुरकुटे (६३, रा. देवकरा, ता. अहमदपूर), बाबुराव पांडुरंग दहिफळे (६८, रा. कोळवाडी, ता. अहमदपूर) असे मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतकरी आपल्या शेतात जेसीबीच्या साह्याने विहीर खोदकाम करत आहेत. अहमदपूर तालुक्यातील किनगाव परिसरातील देवकरा शिवारात ही दोन विहिरींचे खोदकाम सुरू होते. प्रभाकर मुरकुटे यांच्या विहिरीचे जवळपास ३५ ते ४० फूट खोदकाम झाले असून उर्वरित दगडाचे खडक बनविण्यासाठी चैनवरील जेसीबी जात होते तेव्हा प्रभाकर मुरकुटे व बाबूराव दहिफळे हे दोघे जेसीबीच्या मागे जात होते. अचानकपणे जेसीबीने पेट घेऊन आग लागली आणि स्फोट झाला. त्यात जेसीबीचे पत्रे उडून जबर लागल्याने सदरील दोघे ठार झाले. चालक भगतराज नारायण सारेआम (रा. चिलखा, मध्यप्रदेश) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाईला हलविण्यात आले. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी जॉन डॅनियल बेन, जिल्हा परिषद सदस्य अशोक केंद्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे, किनगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी कृष्णा मुरकुटे यांच्या जबाबावरून प्रभाकर मुरकुटे व बाबूराव दहिफळे यांच्या ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद किनगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली.

दोन कि.मी.पर्यंत आवाज...

जेसीबी शेतातील खड्ड्यात जाऊन आदळल्याने स्फोट होऊन आग लागल्याचे गावकरी सांगत आहेत. जेसीबीचा स्फोट एवढा मोठा होता की, अर्धा कि.मी.पर्यंत जेसीबीचे पत्रे उडून गेले होते. तसेच दोन कि.मी. अंतरापर्यंत स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. हा स्फोट नेमका कशाने झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत. आवाज घेण्यासाठी विहिरीमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यात आल्या असाव्यात, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

नेमके कारण सांगता येत नाही...

सदरील शेतातून महावितरणच्या विद्युत तारा गेल्या आहेत. जेसीबीचा त्या विद्युत तारांना स्पर्श झाला असावा. त्यातूनच जेसीबी पेट घेऊन स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, निश्चित सांगता येत नाही. नेमके कारण लवकरच समजेल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड यांनी सांगितले.

सोबत फोटो : १९ एलएचपी किनगाव १ : जेसीबीने घेतलेला पेट.

१९ एलएचपी किनगाव २ : स्फोटानंतर जेसीबीची स्थिती

Web Title: Two killed, one injured in JCB blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.