अंत्यसंस्कारास मृतदेह नेण्यासाठी वाहनाची दोन तास प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:20 IST2021-04-21T04:20:10+5:302021-04-21T04:20:10+5:30
चाकूर (जि. लातूर) : तालुक्यातील एका ५२ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने ते उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात सोमवारी ...

अंत्यसंस्कारास मृतदेह नेण्यासाठी वाहनाची दोन तास प्रतीक्षा
चाकूर (जि. लातूर) : तालुक्यातील एका ५२ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने ते उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात सोमवारी (दि. १९) दाखल झाले. दरम्यान, त्यांचा सकाळी ११.४५ च्या सुमारास रुग्णालयातच मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह अंत्यविधीला नेण्यासाठी शववाहिका उपलब्ध नसल्याने नातेवाइकांना तब्बल दोन ते तीन तास ताटकळत थांबावे लागल्याचे पाहावयास मिळाले.
तालुक्यातील एका गावातील एकजण कोविड केअर सेंटरमध्ये तपासणी करून आपल्या गावी गेले. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी बोलाविण्यात आले. त्यामुळे ते येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. परंतु, त्यांच्या दुर्दैवाने सोमवारी सकाळी ११.४५ वा.च्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यामुळे नातेवाइकांनी अंत्यविधी करण्याची मागणी केली. परंतु, ग्रामीण रुग्णालयात शववाहिका नसल्याने नातेवाइकांनी खासगी वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, कोरोनाच्या धास्तीने खासगी वाहनधारकही धजावेनात.
दरम्यान पत्रकार ओमप्रकाश लोया, सतीष गाडेकर हे रुग्णालयात आले. त्यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्याशी संपर्क साधून वाहनाची सोय करण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी नगरपंचायत केवळ अंत्यसंस्कार करते. वाहनाची सोय करीत नसल्याचे सांगितले. त्यानंतर तहसीलदार शिवानंद बिडवे यांना सदरील हकिकत सांगितली असता त्यांनी शववाहिका उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.
खासगी वाहन येण्यास धजावत नसल्याने अखेर एका डॉक्टरना विनंती करण्यात आली. त्यांनी वाहनाची सोय करून दिली. मृतदेह अंत्यविधीसाठी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला. अखेर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी प्रशासनाने वाहनाची सोय करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.