जिल्हा परिषद सदस्यांच्या शेष निधीत तिपटीने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:22 IST2021-03-09T04:22:02+5:302021-03-09T04:22:02+5:30
जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली तहकूब झालेली सर्वसाधारण सोमवारी पार पडली. यावेळी उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, समाजकल्याण सभापती ...

जिल्हा परिषद सदस्यांच्या शेष निधीत तिपटीने वाढ
जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली तहकूब झालेली सर्वसाधारण सोमवारी पार पडली. यावेळी उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, महिला व बालकल्याण सभापती ज्योती राठोड, आरोग्य व बांधकाम सभापती संगीता घुले, कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांची उपस्थिती होती. सभापती घुले यांनी जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात चालू वर्षाची सुरुवातीची शिल्लक २४ कोटी ३६ लाख ६९ हजार ५१९ रुपये, अपेक्षित जमा १९ कोटी ७ लाख ३५ हजार, तर आगामी वर्षात अपेक्षित खर्च १९ कोटी ३७ लाख २ हजार रुपयांचा सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पाचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी स्वागत करून सदस्यांच्या सूचनेनुसार दुरुस्त करावा, असे म्हटले.
सदस्य महेश पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्यांना थांबण्यासाठी सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी केली. तसेच सुरेश लहाने यांनी महिला सदस्यांसाठी स्वतंत्र सभागृह निर्माण करावे, असा ठराव मांडला. तेव्हा अध्यक्ष केंद्रे यांनी महिनाभरात महिला सदस्यांसाठी स्वतंत्र दालन उभारण्यात येईल, असे सांगितले.
दरम्यान, रामचंद्र तिरुके यांनी सदस्यांचा शेष निधी २ ते ५ लाखांपर्यंत करावा, अशी मागणी केली. तेव्हा सदस्य नारायण आबा लोखंडे, पांडुरंग पवार, बसवराज बिराजदार, सुरेश लहाने सोनाली थोरमोटे यांनीही ही मागणी लावून धरली. त्यामुळे अध्यक्ष केंद्रे यांनी शेष निधी ३ लाख करण्याचा निर्णय घेतला.
समान निधीच्या वाटपाची मागणी...
सदस्य महेश पाटील यांनी समान निधीचे वाटप करण्यात यावे. निधी वाटपात विषमता होऊ नये, अशी मागणी करीत औसा तालुक्यास कमी निधी मिळाल्याचे सांगितले. पाण्याच्या थेंबाचाही योग्य पद्धतीने वापर करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मॉडेल गाव निर्माण करण्यासाठी ५० लाखांची तरतूद करावी, अशी मागणी केली. तेव्हा अध्यक्ष केंद्रे यांनी अहमदपूर तालुक्यातील ढाळेगावची निवड करणार असून १५ व्या वित्त आयोगातून निधी देण्यात येणार असल्याचे सांगितले.