कोरोना काळात १०७ कुपोषितांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:26 IST2021-02-26T04:26:12+5:302021-02-26T04:26:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : नवजात बालकांच्या जीवनातील सुरुवातीचे दिवस अत्यंत महत्वाचे असतात. पहिल्या दोन वर्षांत बालकांची शारीरिक व ...

कोरोना काळात १०७ कुपोषितांवर उपचार
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : नवजात बालकांच्या जीवनातील सुरुवातीचे दिवस अत्यंत महत्वाचे असतात. पहिल्या दोन वर्षांत बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ होत असते. या कालावधीत त्यांचे आरोग्य व पोषणाकडे दुर्लक्ष झाल्यास दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने कुपोषित बालकांवर उपचारासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्याअनुषंगाने कोरोना काळात १०७ कुपोषित बालकांवर उपचार करण्यात आले असून, त्यापैकी ९७ जणांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
कोरोना काळात सर्व क्षेत्रावर परिणाम झाला. अनेक कामे ठप्प होती. अंगणवाडी स्तरावरून राबविल्या जातात. मात्र कोरोना काळातही बालकांविषयीच्या मोहिमा यशस्वीपणे राबविण्यात आल्या. जिल्ह्यात कोरोना काळात १०७ कुपोषित बालकांना सेवा देण्यात आली. त्यापैकी ९७ बालकांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्याबरोबर २०१६ मध्ये २१४, २०१७ मध्ये १३६, २०१८ मध्ये ११६, २०१९ मध्ये १०९ तर २०२० या वर्षात १११ अशा एकूण ६८६ बालकांना सेवा दिली गेली असून, यातील ६२३ बालकांची प्रकृती सुधारली असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभाग तसेच आरोग्य विभागाच्या वतीने अंगणवाडीस्तरावर गरोदर मातांना सकस आहाराचे नियमित वितरण केले जाते. कोरोना काळातही सदरील सेवा सुरू ठेवण्यात आली होती. आरोग्य विभागाच्या वतीने सेवा देण्यात आलेल्या बालकांवरही विशेष लक्ष असून, त्यांच्या आरोग्यविषयक बाबींची नियमित तपासणी होत आहे.
कोरोना काळातही आरोग्य विभागाच्या वतीने आहाराचे नियमित वाटप केले जात होते. नियमित वजन करणे, उपचार करणे आदी कामे चांगल्याप्रकारे करण्यात आली. तालुकानिहाय नियोजन करण्यात आले होते. अंगणवाडी सेविकांनीही यामध्ये मोलाची भूमिका बजावली. - देवदत्त गिरी,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व
बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद
आरोग्य विभागाच्या वतीने सकस आहार देणे, व्हिटॅमीन, कॅल्शियम गोळ्या देणे, नियमित बालकांचे वजन करणे, सामान्य वजन भरल्यानंतर कुपोषणमुक्त घोषित करणे आदी कामे केली जातात. गेल्या ५ वर्षांत ६८६ बालकांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी ६२३ बालकांची प्रकृती सुधारली आहे.