सीमावर्ती भागातील रुग्णांना वेळेवर उपचारासाठी ट्रामा केअर सेंटरची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:20 IST2021-05-07T04:20:29+5:302021-05-07T04:20:29+5:30
देवणी : देवणी सीमावर्ती तालुका असून आरोग्यविषयक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. यासाठी रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणी जावे लागते. ...

सीमावर्ती भागातील रुग्णांना वेळेवर उपचारासाठी ट्रामा केअर सेंटरची गरज
देवणी : देवणी सीमावर्ती तालुका असून आरोग्यविषयक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. यासाठी रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणी जावे लागते. परिणामी यामुळे विलंब होतो आणि अधिक खर्च वाढतो आहे. शहरात ग्रामीण रुग्णालय तर बोरोळ, वलांडी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रासह जवळपास सात-आठ उपकेंद्र सध्या कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता येथे ट्रामा केअर सेंटर गरजेचे आहे. त्यामुळे देवणी येथे ट्रामा केअरसही नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची मागणी देवणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन मानकरी यांनी पालकमंत्री, आरोग्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
देवणी येथील ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर सुरू झाल्यास वैद्यकीय अधिकारी, सर्जन, फिजिशियन, आर्थोपेडिक आदी तज्ज्ञ डॉक्टरांसह इतर कर्मचारी वर्ग उपलब्ध होणार आहे. परिणामी, रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सेवा देण्यात मदत होईल. नव्याने ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यासाठी सद्य:स्थितीत इमारती उपलब्ध आहेत. त्यामुळे शासनाला ट्रामा सेंटर सुरू करण्यासाठी खर्च पण कमी येणार आहे. शिवाय सध्याची वाढती रोगराई, अपघात रुग्णांची संख्या पाहता जिल्ह्यातील मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयाप्रमाणे देवणी येथे ट्रामा सेंटर त्वरित मंजूर करून सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
२० प्रशिक्षणार्थींचे नर्सिंग कॉलेज सुरू करा...
या ट्रामा केअर सेंटर सोबतच येथील ग्रामीण रुग्णालयात बाभळगाव ग्रामीण रुग्णालयाप्रमाणे देवणी येथील ग्रामीण रुग्णालयात २० प्रशिक्षणार्थीचे नर्सिंग कॉलेज मंजूर करून सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. नर्सिंग कॉलेज सुरू केल्यास कर्मचाऱ्यांचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल. असेही निवेदनात म्हटले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन मानकरी यांनी सदरील निवेदन पालकमंत्री, आरोग्यमंत्री यांना दिले आहे.