लातूर जिल्हा परिषदे अंतर्गत ३ अधिकारी, दोन सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या
By हरी मोकाशे | Updated: May 29, 2023 19:06 IST2023-05-29T19:06:24+5:302023-05-29T19:06:40+5:30
रेणापूरचे बीडीओ अभंगे आता पाणीपुरवठ्याचे डेप्युटी सीईओ,चाकूरच्या लोखंडे यांना वर्षाची मुदतवाढ

लातूर जिल्हा परिषदे अंतर्गत ३ अधिकारी, दोन सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या
लातूर : राज्य शासनाने जिल्हा परिषदेअंतर्गतचे तीन गटविकास अधिकारी तसेच दोन सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. दरम्यान, चाकूरचे गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडेे यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे.
मे महिना सुरु झाला की जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बदलीचे वेध लागतात. गेल्या १५ दिवसांपासून जिल्हा परिषदेतील वर्ग- ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंतीवरुन बदल्या झाल्या. त्यानंतर कालावधी पूर्ण झालेले सहाय्यक गटविकास अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांचे बदलीकडे लक्ष लागून होते. दरम्यान,राज्य सरकारने या बदल्यांचे आदेश काढले आहेत.
जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे यांची परभणी जिल्ह्यातील सेलू येथे गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी रेणापूरचे बीडीओ मोहन अभंगे यांची बदली झाली आहे. निलंग्याचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांची तुळजापूर येथे बदली झाली आहे. मनरेगाचे सहाय्यक गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी यांची औसा येथे सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून, औश्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी सतीश पाटील यांची रेणापूरचे सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली आहे. चाकूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे.