अनधिकृत थांब्यामुळे अहमदपुरात वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:33 IST2021-02-06T04:33:56+5:302021-02-06T04:33:56+5:30
अहमदपूर : शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला असून दोन महामार्ग एकत्र आल्यामुळे वाहतुकीची कोंडी वाढली आहे. त्यात बसस्थानकासमोर अवैध वाहतूक ...

अनधिकृत थांब्यामुळे अहमदपुरात वाहतुकीची कोंडी
अहमदपूर : शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला असून दोन महामार्ग एकत्र आल्यामुळे वाहतुकीची कोंडी वाढली आहे. त्यात बसस्थानकासमोर अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे थांबे वाढल्यामुळे आणखीन भर पडत आहे. दरम्यान, तहसीलदारांनी वाहतुकीविषयी दिलेल्या पत्राला पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक व स्वा. सावरकर चौक परिसरात हातगाडी व अवैध वाहतूक करणारी वाहने थांबतात. त्यामुळे हा परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. पालिकेचे दुर्लक्ष तसेच महामार्ग प्राधिकरण विभागाच्या हतबलतेमुळे वाहतुकीची कोंडी सातत्याने वाढत आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर थांबत आहेत. तसेच फळविक्रेतेही अतिक्रमण करीत गाडे उभे करीत आहेत.
शहरातील सर्व चौकांतील पुतळ्याभोवती अवैध प्रवासी वाहतूक करणारी जीप, ऑटो, टमटम व छोटा हत्ती ही वाहने थांबत आहेत. त्याठिकाणी या वाहनधारकांनी अनधिकृत थांबा केला आहे. बसस्थानकासमोरील दोन्ही फाटकासमोर एखादी बस आल्यानंतर लगेच ऑटोचालक बसच्या दारासमोर ऑटो उभे करीत आहेत. त्यामुळे प्रवाशांबरोबरच बसचालकांनाही अडचणीला सामोरे जावे लागत आहे. शहरातील मुख्य चौक ते आझाद चौक तसेच थोडगा रोडवर वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. परिणामी, वाहतूकही विस्कळीत होते.
बसस्थानकाच्या गेटसमोरच ऑटोचालक जावून प्रवासी भरत आहेत. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत तहसीलदारांनी पोलिसांकडे तहसील व स्वा. सावरकर चौकातील वाहने हटविण्यासाठी पत्रव्यवहार केला. मात्र, त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. वाहतूक शाखेत केवळ एक पोलीस कर्मचारी कार्यरत आहे. त्यामुळे शहरात स्वतंत्र वाहतूक शाखा निर्माण करावी, अशी मागणी होत आहे.
महामार्गाच्या कामामुळे अडचण...
शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच स्वा. सावरकर चौक, तहसील कार्यालयासमोर वाहने थांबत असल्याने वाहतुकीच्या समस्येत आणखीन भर पडत आहे. याबाबत पोलीस प्रशासनासोबत समन्वयाची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांनी सांगितले.
लवकरच वाहतूक सुरळीत...
वाहतूक व्यवस्था केवळ एका पोलीस कर्मचाऱ्यावर आहे. त्यामुळे वाहतूक शाखेसाठी एक पोलीस उपनिरीक्षक, तीन पोलीस कर्मचारी व काही होमगार्ड कायम ठेवण्यासाठी सूचना केल्या असून रिक्षाचालक व नागरिकांनीही वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. त्यामुळे काही दिवसांत वाहतूक सुरळीत होईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले यांनी सांगितले.
बसस्थानकासमोर ऑटोचालकांची मनमानी...
बसस्थानकासमोरील दोन्ही गेटसमोर ऑटोचालक वाहने थांबवत आहेत. त्यामुळे प्रवाशांसह बसचालकांनाही त्रास होत आहे. तसेच ग्रामीण भागातील अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटी तोट्यात जात आहे, असे आगारप्रमुख शंकर सोनवणे यांनी सांगितले.