अहमदपूर : केंद्र सरकारच्या डाळ साठवणूक धोरणाच्या विरोधात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत व्यापाऱ्यांनी शेतीमालाचा सौदा पुकारणे आठवडाभरापासून बंद ठेवले आहे. त्यामुळे बाजारपेठेतील व्यवहार ठप्प आहेत.
आडत व्यापाऱ्यांनी गत वर्षी मोठ्या प्रमाणात डाळवर्गीय शेतीमालाची खरेदी केल्यानंतर केंद्र शासनाने त्याच्या साठवणुकीवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे किराणा, आडत खरेदीदारांच्या साठवणुकीवर मर्यादा आली आहे. त्याच्या निषेधार्थ राज्यातील सर्व आडत व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. त्यास प्रतिसाद देत अहमदपुरातील व्यापाऱ्यांनी सहभागी होत आठ दिवसांपासून व्यवहार बंद ठेवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा सौदा होत नाही. शेतीमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची अडचण हाेत आहे.
व्यवहार ठप्प असल्याने शेकडो टन शेतमाल बाजार समितीत पडून आहे. सौदा नसल्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज २५ लाखांची उलाढाल होते. मात्र, मागील आठ दिवसांपासून उलाढाल नसल्यामुळे शुकशुकाट आहे.
डाळ साठवणूक विरोधी धोरण...
व्यापाऱ्यांनी गतवर्षी मोठ्या प्रमाणात डाळवर्गीय धान्याची खरेदी केली. मात्र, यावर्षी अचानक केंद्र शासनाने साठवणुकीवर मर्यादा आणल्यामुळे व्यापारी अडचणीत येत आहेत. त्याच्या निषेधार्थ हा बंद सुरू असल्याचे व्यापारी अनिल मेनकुदळे यांनी सांगितले.
अडचणीत आणण्याचे धोरण...
केंद्र शासनाचे धोरण हे व्यापाऱ्यांना अडचणीत आणण्याचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही त्रास होत आहे. या धोरणाच्या विरोधात व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद सुरू केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांसोबत असल्याचे बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे यांनी सांगितले.