परीक्षा शुल्क मिळविण्यासाठी करा जि.प. च्या संकेतस्थळावर क्लिक १० हजार उमेदवार
By हरी मोकाशे | Updated: September 18, 2023 21:41 IST2023-09-18T21:39:46+5:302023-09-18T21:41:29+5:30
लवकर भरा माहिती

परीक्षा शुल्क मिळविण्यासाठी करा जि.प. च्या संकेतस्थळावर क्लिक १० हजार उमेदवार
लातूर : राज्य सरकारने मार्च २०१९ व ऑगस्ट २०२१ मध्ये ३४ जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले होते. मात्र, ही प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यामुळे उमेदवारांचे परीक्षा शुल्काकडे लक्ष लागून होते. दरम्यान, हे शुल्क परत देण्याचा ग्रामविकास विभागाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी शासनाच्या https://maharddzp.com संकेतस्थळावर उमेदवारांनी संपूर्ण माहिती भरावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या गट- क मधील १८ संवर्गातील पदांच्या भरतीसाठी मार्च २०१९ मध्ये ग्रामविकास विभागाने जाहिरात प्रसिध्द केली होती. तसेच ऑगस्ट २०२१ मध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द केली होती. दरम्यान, शासनाने ही भरती प्रक्रिया रद्द केली.
या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार उमेदवारांनी जिल्हा परिषदेच्या www.zplatur.gov.in संकेतस्थळावर जाऊन माहिती घ्यावी आणि काळजीपूर्वक माहिती भरावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी केले आहे.
अचूक माहिती भरावी...
परीक्षा शुल्क परत मिळविण्यासाठी उमेदवारांनी https://maharddzp.com संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक, बँक खाते क्रमांक, पावती, फोन क्रमांकासह पत्ता अशी आवश्यक ती माहिती अचूकपणे भरावी. सदरील संकेतस्थळाची लिंक ही लातूर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर आहे. जिल्ह्यातील १० हजार ९२ उमेदवारांना लाभ मिळणार आहे.
- नितीन दाताळ, डेप्युटी सीईओ, सामान्य प्रशासन.