शाळा बंद असल्याने स्कूल बस चालकांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:13 IST2021-06-30T04:13:41+5:302021-06-30T04:13:41+5:30
अहमदपूर : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने स्कूल बस चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुले घरीच ...

शाळा बंद असल्याने स्कूल बस चालकांवर उपासमारीची वेळ
अहमदपूर : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने स्कूल बस चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुले घरीच ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. मात्र बसची चाके थांबल्याने बँकेच्या कर्जाने घेतलेल्या गाडीचे हप्ते थांबले आहेत. हप्त्याचे व्याजदर वाढत असल्याने स्कूल बस चालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शाळाच बंद असल्याने स्कूल बसचालक व मालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
गेल्या १५ महिन्यांपासून शाळा बंद असल्याने मुलांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल बस जागीच उभ्या आहेत. स्कूल बस बंद असल्याने मिळेल ते काम करून बसचालक उदरनिर्वाह करीत होते. मात्र सध्या मजुरीचे काम मिळेल याची शाश्वती नाही. शेतीमध्ये सध्या मशागतीची कामे चालू असल्याने मोलमजुरीवर पोट भरणारे बसचालक सध्या काम नसल्याने दोनवेळच्या जेवणाची चिंता करताना दिसून येत आहे. मुलांना शाळेत आणि शाळेतून घरी आणणारे बसचालक बस घरीच उभीच असल्यामुळे स्वतःच्या संसाराची बस कशी चालवायची, अशा द्विधा मनस्थितीत आहेत. अनेक तरुणांनी नोकरी भेटत नसल्यामुळे बँकेचे कर्ज काढून स्कूल बस खरेदी केली. गरजेनुसार त्यांनी अनेक शाळांवर मुले घेऊन जाण्याचे काम करायला सुरुवात केली होती. पालकांनीही सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्या पाल्यांसाठी स्कूल बसला पसंती दिली होती. त्यामुळे अनेक तरुणांना रोजगार मिळाला होता. मात्र मागील वर्षी कोरोनामुळे संचारबंदी लागली. संसर्ग वाढत गेल्याने बाजारपेठ, आठवडे बाजार, दुकाने बंद ठेवण्याची वेळ आली. परिणामी, बस चालकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. शासनाने स्कूल बस चालकांकडे ही लक्ष देऊन रिक्षाचालक प्रमाणे स्कूल बसचालकांना मदत करावी अशी मागणी होत आहे.
बँकाच्या
कर्जाचा डोंगर वाढला...
सुशिक्षित बेरोजगार असल्याने विद्यार्थी वाहतुकीकरिता लाखो रुपये कर्ज घेऊन स्कूल व्हॅन, बस खरेदी केल्या. मात्र, कोरोनाकाळात चाके थांबल्याने अर्थचक्र ठप्प झाले आहे. कर्जाचा डोंगर वाढला आहे. बँका, फायनान्स कंपन्यांच्या वसुलीचा तगादा लावत आहेत. यामुळे आमची उपासमार होत आहे. कर्जाचा भरणा कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कुटुंबाचा गाडा कसा चालवावा...
शाळा बंद असल्याने चालक-मालक मोठ्या अडचणीत आहे. शासनाने रिक्षाचालकांना जशी कोरोनाच्या काळात आर्थिक मदत केली त्याप्रमाणे आम्हाला मदत करावी. पंधरा महिन्यांपासून स्कूल बसेस बंद असल्यामुळे बस चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. अनेक जण कामाच्या शोधात फिरत आहेत. पण काम मिळत नसल्याने स्कूल बसचालक व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांना जशी मदत केली आहे. तशी मदत बसचालकांना करावी.
- नरहरी पवार,
स्कूल बस चालक
कोरोनामुळे स्कूल बसेस गेल्या पंधरा महिन्यांपासून एकाच ठिकाणी थांबून आहेत. फायनान्सवाल्यांचा तगादा चालू आहे. गाड्यांचे टॅक्स,
व्यवसायकर, फायनान्सचे व्याज चालू आहे. गाड्यांचा हप्ता नाही भरल्यास गाडी जप्तीची धमकी मिळत आहे. गेल्या पंधरा महिन्यांपासून स्कूल बसेस बंद असल्याने आमच्या कुटुंबाची अवस्था खूप बिकट बनली आहे.
- अनिल गंगथडे,
स्कूल बस मालक
अडचणी वाढल्या, मदतीची अपेक्षा...
एकीकडे कमाई बंद असून
फायनान्सचे हप्ते थकले आहेत. फायनान्स कंपन्यांकडून वाहन जप्तीची कारवाई सुरू आहे. यामुळे मानसिक त्रास वाढला आहे. मी सुशिक्षित बेरोजगार आहे. नोकरी न मिळाल्याने काही पैसे भरून व फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन स्कूल बस घेतली. परंतु पंधरा-सोळा महिन्यांपासून गाडी उभी असल्याने हप्ते थकले असल्याने कौटुंबिक खर्च व गाडीचा हप्ता कसा भरावा असा प्रश्न आहे.
- विलास सूर्यवंशी , स्कूल बस मालक