लातूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील डाळज नं- २ च्या हद्दीत रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातातलातूरातील एकाच कुटुंबातील आई, वडील, मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
गीता अरुण माने, अरुण बाबुराव माने व मुलगा मुकुंद अरुण माने (रा. लक्ष्मी कॉलनी, शिवाजी शाळेसमोर, खाडगाव रोड, लातुर) असे अपघातात ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. लातूरातील गीता माने, अरुण माने, मुकुंद माने, साक्षी माने व कारचालक हे पाच जण रविवारी सकाळी खाजगी कामानिमित्त पुण्याला गेले होते. तेथील काम आटोपून रात्री ते लातूरकडे निघाले होते.
दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गावरील डाळज नं-२ हद्दीत त्यांच्या कारचा आणि ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाला. यात गीता माने, अरुण माने, मुकुंद माने हे तिघे ठार झाले आहेत. मुलगी साक्षी माने आणि कारचालक हे जखमी झाले आहेत. अरुण माने हे लातूरातील टायर व्यावसायिक असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.