लातूर : कारमध्ये बसून क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीतील तिघांची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने रविवारी सायंकाळी छापा मारला. तिघांसह कार असा एकूण १६ लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खबऱ्याने पॉईंट सांगितला आणि पोलिस पथकाने सट्टेबहाद्दरांचा डाव उधळला. याबाबत भादा पोलिस ठाण्यात साेमवारी पहाटे दाेन वाजता सात जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेगवेगळ्या वाहनांतून ठिकाण बदलत सट्टा घेत असल्याची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या आठ दिवसांपासून पाळत ठेवत त्यांचा माग काढला. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास औसा-तुळजापूर महामार्गावरील आशिव टोलनाक्याच्या पुढे असलेल्या एका हॉटेलसमोर पांढऱ्या रंगाची क्रेटा कार (एमएच १२ टीएच ०८०८) थांबल्याचे दिसून आले. पथकाने तातडीने कारवर छापा मारला. यावेळी रणजीत दत्तात्रय सोमवंशी (३१, रा. चांडेश्वर), शुभम कंठप्पा धरणे (२७, रा. पेठ), अविनाश सतीश मुळे (२७, रा. पेठ) हे क्रिकेट सामन्यावर फोनद्वारे सट्टा घेत होते. त्यांच्याकडून मोबाइल, टॅब आणि कार असा मुद्देमाल जप्त केला.
१६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती...
शुभम धरणे, रणजीत सोमवंशी आणि अविनाश मुळे याने बुक्की मालक, तसेच आदेश बिसेन (रा. लातूर), मलंग (रा. लातूर) आणि अखिल (रा. लातूर) यांच्या सांगण्यावरून लोकांकडून पैसे घेऊन आकड्यावर लावून क्रिकेटवर सट्टा खेळवीत असताना आढळून आले. यावेळी ताब्यात घेतलेल्या तिघांकडून मोबाइल, टॅब आणि क्रिकेट सट्ट्यासाठी वापरण्यात आलेली क्रेटा कार असा एकूण १६ लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. याबाबत पोउपनि. राजाभाऊ घाडगे यांच्या तक्रारीवरून भादा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
सतत लोकेशन बदलले;पाठलाग करीत पकडले...
खबऱ्याने दिलेली टीप आणि सट्टाबहाद्दर वाहनात असल्याने क्षणाक्षणाला लोकेशन बदलत होते. स्थागुशाच्या पथकाने पाठलाग करीत औसा-तुळजापूर मार्गावर उजनी टोल नाक्याच्या पुढे रविवारी कारसह तिघांना पकडले. ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार स्थागुशाचे पोनि. संजीवन मिरकले, पोउपनि. राजाभाऊ घाडगे, युवराज गिरी, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, दिनेश देवकत्ते, मोहन सुरवसे, मुन्ना मदने, जमीर शेख यांच्या पथकाने केली. गेल्या आठ दिवसांपासून सट्टाबहाद्दरांवर पोलिस पथकाने पाळत ठेवली होती.