देवणी पोलिसांनी सांगितले, १० जुलै रोजी सायंकाळी मोघा येथील फिर्यादीच्या घरासमोरील अंगणात आरोपींनी संगणमत करून जातीवाचक शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. तसेच उठाबशा काढण्यास लावल्या आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादीचा मुलगा गोपाळ धनाजी सूर्यवंशी (१७, रा. मोघा, ता. उदगीर) याने संबंधित लोकांच्या त्रासामुळे घरातील विषारी तणनाशक औषध प्राशन केले. त्याला उपचारांसाठी उदगीर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, १२ जुलै रोजी रात्री ९ वा.च्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत मुलाचे वडील धनाजी भिवाजी सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून देवणी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये तुळशीदास तथा चेतन माधवराव कबाडे, गोविंद देवराव काळोजी, बळी बिरू भंडे (रा. मोघा) यांच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, निलंग्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश कोल्हे व पोलीस निरीक्षक सी.एस. कामठेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. अधिक तपास निलंग्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश कोल्हे हे करीत आहेत.