घरफोडीतील तिघे जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:20 IST2021-04-07T04:20:01+5:302021-04-07T04:20:01+5:30
पोलिसांनी सांगितले, अडीच ते तीन महिन्यांपूर्वी याकतपूर रोड औसा येथे एका घराचे कुलूप तोडून चोरी झाली होती. त्यानंतर लातूर ...

घरफोडीतील तिघे जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी सांगितले, अडीच ते तीन महिन्यांपूर्वी याकतपूर रोड औसा येथे एका घराचे कुलूप तोडून चोरी झाली होती. त्यानंतर लातूर येथील रिंग रोडवर एका पेट्रोल पंपाजवळ झोपलेल्या व्यक्तीच्या खिशातून मोबाइल तसेच पैसे चोरीला गेले होते. भादा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उजनी येथेही मोबाइल चोरीला गेला होता. शिवाय, आठ-दहा दिवसांपूर्वी औसा येथे दोन घरांचे कुलूप तोडून रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना आरोपींची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात अमोल ऊर्फ पप्पू भागवत शिंदे, अजय ऊर्फ दुडी सुरकास पवार, रामाचारी बिस्कीट ऊर्फ भिमन्ना पवार यांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने लातूर येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता घरफोडी करून रक्कम चोरली असल्याचे त्यांनी कबूल केले. त्यांच्याकडून २५ ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन मोबाइल, अकराशे रुपये असा एकूण १ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी सांगितले. सदर आरोपींविरुद्ध औसा, विवेकानंद चौक पोलीस ठाणे, भादा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता दोन महिन्यांपासून स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलीस ठाण्याचे पथक परिश्रम घेत होते. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळ, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, अंमलदार अंगद कोतवाड, रामहरी भोसले, युसुफ शेख, राम गवारे, राजेंद्र टेकाळे, हरुण लोहार, राजू मस्के, प्रकाश भोसले, नितीन कटारे, नागनाथ जांभळे आदींनी या कारवाईत परिश्रम घेतले.