उत्तम आरोग्यासाठी धावले हजारो लातूरकर; आयएमएचा उपक्रम, आयएमएथॉनला अबालवृध्दांचा सहभाग

By आशपाक पठाण | Published: March 3, 2024 07:38 PM2024-03-03T19:38:37+5:302024-03-03T19:38:49+5:30

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित आयएमएथॉन लातूर २०२४ मॅरेथॉन स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

Thousands of Laturkars ran for better health Youth participation in IMAthon, an initiative of IMA | उत्तम आरोग्यासाठी धावले हजारो लातूरकर; आयएमएचा उपक्रम, आयएमएथॉनला अबालवृध्दांचा सहभाग

उत्तम आरोग्यासाठी धावले हजारो लातूरकर; आयएमएचा उपक्रम, आयएमएथॉनला अबालवृध्दांचा सहभाग

लातूर: येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित आयएमएथॉन लातूर २०२४ मॅरेथॉन स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद लाभला. ३, ५, १० व २१ किलोमीटरसाठी झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये १५०० पेक्षा जास्त धावपटूंनी उत्साहाने सहभाग नोंदविला. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम महत्वाचा असल्याचा संदेश यातून देण्यात आला. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर स्त्री शक्तीचे सक्षमीकरण आणि समानता अशी थीम आयोजकांनी निवडली होती.

औसा रोडवरील बिडवे लॉन्स येथे स्पर्धेचा प्रारंभ जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, लातूर अर्बन बँकेचे संस्थापक चेअरमन प्रदीप राठी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी नमन गोयल, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या हस्ते करण्यात आली. २१ किलोमीटरसाठी २४० व दहा किलोमीटर साठी ६५० धावपटूंनी सहभाग नोंदवला. ५ किलोमीटर व ३ किलोमीटर च्या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते झाली. यावेळी सुभाष कासले, धर्मवीर भारती, नागनाथ गित्ते, नंदकिशोर अग्रवाल, मिनू अग्रवाल, गणेश बिडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धेच्या यशस्वितेसाठी आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल राठी, सचिव डॉ. आशिष चेपुरे, वूमेन्स विंगच्या अध्यक्षा डॉ. प्रिती बादाडे, सचिव डॉ. प्रियंका राठोड, उपाध्यक्ष डॉ. अशोक पोद्दार, डॉ. अनुजा कुलकर्णी, डॉ. हर्षवर्धन राऊत, डॉ. अर्जुन मंदाडे, डॉ. आरती झंवर, डॉ. चांद पटेल, डॉ. ब्रिजमोहन झंवर, डॉ. अजय जाधव, डॉ .चेतन सारडा, डॉ. विक्रम सारडा, डॉ. शितल ठाकूर - टीके, डॉ. सतीश हंडरगुळे, डॉ. चंद्रशेखर अष्टेकर , डॉ. ज्योती सूळ, डॉ. केतकी चवंडा यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण...
२१ किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये खुला गटातून गणेश सुरवसे वैभव कांबळे व गंगाधर सोमवंशी व स्त्री गटातून पुष्पा राठोड, परिमला बाबर व राणी लोया यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. २१ किलोमीटर डॉक्टर्स गटामधून डॉ. दिनकर बिरादार, डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. महेश कदम तर महिला गटामधून डॉ. वृषाली बंडगर, डॉ. वैशाली इंगोले, डॉ. रचना बियाणी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. फर्स्ट एड किट आणि पेन किलर स्प्रे चा वापर करून धावपटूंचा थकवा दूर करण्यात डॉ. पल्लवीं जाधव, डॉ. वीरेंद्र मेश्राम व डॉ. गौरव भटनागर यांच्या नेतृत्वाखाली फिजिओथेरपी टीमने महत्त्वाची भूमिका बजावली. बक्षीस वितरण आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन समीर बजाज व डॉ. आशिष चेपुरे यांनी केले.

Web Title: Thousands of Laturkars ran for better health Youth participation in IMAthon, an initiative of IMA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर