शेतीच्या वीज पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी हजार शेतकरी सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:21 IST2021-08-29T04:21:13+5:302021-08-29T04:21:13+5:30
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील सहा गावांतील शेतकऱ्यांच्या बागायती शेतीला कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने नुकसान होत आहे. त्यामुळे वीज ...

शेतीच्या वीज पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी हजार शेतकरी सरसावले
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील सहा गावांतील शेतकऱ्यांच्या बागायती शेतीला कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने नुकसान होत आहे. त्यामुळे वीज पुरवठ्याची समस्या मिटविण्यासाठी एक हजार शेतकरी सरसावले आहेत. ग्रामस्वराज्य संघटनेच्या पुढाकाराने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यास या शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन देऊन ३३ केव्ही उपकेंद्र मंजूर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यातील धामणगाव, कारेवाडी, बोळेगाव, नागेवाडी, दगडवाडी, जोगाळा या सहा गावांतील शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी महावितरणच्या येरोळ येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रावरुन विद्युत पुरवठा केला जातो. परंतु, या उपकेंद्रावर प्रचंड भार असल्याने अनेक गावांतील शेतकऱ्यांना कमी दाबाने वीजपुरवठा होतो. त्यामुळे पाणी आहे, पण वीजपुरवठा सुरळीत होत नाही. परिणामी, शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होत आहे. वीज पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी वारंवार महावितरण कार्यालयास निवेदन देण्यात आली. परंतु, त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ग्रामस्वराज्य संघटनेने वीज पुरवठ्याची समस्या कायमची सोडविण्यासाठी पुढाकार घेतला असून, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनराज पाटील धामणगावकर यांनी सहा गावांतील एक हजार शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन सहा गावांसाठी नवीन ३३ केव्ही वीज उपकेंद्र मंजूर करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. त्यासाठी एक हजार शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यास शुक्रवारी देण्यात आले.
पाणी आहे, वीज नसल्याने अडचण...
घरणी मध्यम प्रकल्पातील पाणी साठ्यामुळे तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना बागायती शेतीसाठी फायदा झाला आहे. परंतु शेतकऱ्यांच्या कृषिपंपासाठी कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पाणी आहे, पण वीज नाही अशी शेतकऱ्यांची अडचण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन घटत असल्याचे ग्रामस्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनराज पाटील धामणगावकर यांनी सांगितले.
मराठवाडा मुक्तीदिनी आंदोलन...
तालुक्यातील सहा गावांतील शेतकऱ्यांच्या वीज पुरवठ्याची समस्या कायमची सोडविण्यासाठी महावितरण कार्यालयाने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापर्यंत नवीन ३३ केव्ही वीज उपकेंद्रास मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी आंदोलन करण्यात येणार असल्याचे धनराज पाटील धामणगावकर म्हणाले.