लॉकडाऊनचे निर्देश मागे न घेतल्यास जनतेचा उद्रेक होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:20 IST2021-04-08T04:20:22+5:302021-04-08T04:20:22+5:30
जिल्ह्यात अघोषित लॉकडाऊन करण्यात आला असून याबाबत अनेकांकडून विरोध होऊ लागलेला आहे. या पार्श्वभूमीवर आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी ...

लॉकडाऊनचे निर्देश मागे न घेतल्यास जनतेचा उद्रेक होईल
जिल्ह्यात अघोषित लॉकडाऊन करण्यात आला असून याबाबत अनेकांकडून विरोध होऊ लागलेला आहे. या पार्श्वभूमीवर आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधला. राज्य शासनाने कडक निर्बंध आणून विकेंड लॉकडाऊन घोषित करण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही या निर्णयाचे समर्थन केले होते. परंतु, कडक निर्बंधाच्या नावाखाली शासनाने सर्व व्यापार बंद करून लॉकडाऊनच घोषित केल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री हे निर्णय लादत आहेत. पालकमंत्र्यांनी
जिल्हाधिका-यांना शासनाचे आदेश जशाला तसे राबविण्याचे निर्देश देऊन जनतेवर अन्याय केला असल्याचे आ. निलंगेकर म्हणाले.
लॉकडाऊनपूर्वी सर्वांशी चर्चा करणे गरजेचे होते...
वास्तविक लॉकडाऊन घोषित करण्यापूर्वी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक, कामगार तसेच विविध शैक्षणिक संस्थाचे प्रतिनिधी यांच्यासह लोकप्रतिनिधी व समाजातील विविध घटकांसोबत चर्चा करणे आवश्यक होते. हा निर्णय घेण्यापूर्वी शासन व पालकमंत्र्यांनी हातावर पोट असणा-यांसह छोटे-मोठे व्यापारी, उद्योजकांचा विचार करणे आवश्यक असल्याचे सांगून आ. निलंगेकर म्हणाले, जनतेच्या आरोग्याची जशी तुम्हाला काळजी आहे, तशी आम्हालासुद्धा आहे. अडचणीच्या काळात आम्हाला राजकारण करायचे नाही. मात्र पोटाला चिमटा घेण्याअगोदर त्यांच्या पोटाचा विचार करणेही आवश्यक होते. त्यामुळेच वीजबिलांची वसुली, बँकेची वसुली ही थांबविण्याची मागणी केली. रेमडेसिवीरसारख्या इंजेक्शनची टंचाई असताना पालकमंत्र्यांनी काय भूमिका घेतली, हे स्पष्ट करावे, अशी मागणी केली. कोरोनाच्या संकट काळात भाजपा लोकप्रतिनिधींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांच्या मदतीला धाऊन जावे, असे आवाहनही आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.