गुन्हेगारीतही आले नवीन चेहरे; कोरोनाने वाढविली पोलिसांची डोकेदुखी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST2021-06-20T04:15:18+5:302021-06-20T04:15:18+5:30
लातूर : मार्च २०२० पासून कोरोना महामारीने अनेकांचे जगणे मुश्कील झाले आहे. अर्थचक्र ठप्प झाल्याने अनेक कुटुंब त्रस्त आहेत. ...

गुन्हेगारीतही आले नवीन चेहरे; कोरोनाने वाढविली पोलिसांची डोकेदुखी !
लातूर : मार्च २०२० पासून कोरोना महामारीने अनेकांचे जगणे मुश्कील झाले आहे. अर्थचक्र ठप्प झाल्याने अनेक कुटुंब त्रस्त आहेत. हजारो नागरिकांचे रोजगारही बुडाले आहेत. याच काळात गुन्हेगारी क्षेत्रात नव्या चेहऱ्यांनी शिरकाव केला आहे. सायबर गुन्हेगारी वाढली असून, कोरोनाने पोलीस दलाची मात्र डोकेदुखी वाढविली आहे.
लातूर जिल्ह्यात गुन्हेगारीचा टक्का वाढला आहे. लॉकडाऊनच्या काळात गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले. मात्र व्यवहार पूर्वपदावर आल्यानंतर गुन्हेगारीने डोके वर काढले. यात दरोडा, घरफोडी जबरी चोरी, फसवणूक, शेतीचे वाद, अपघात, मटका, जुगार आणि इतर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. ऑनलाइन फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. नव्या चेहऱ्यांनी गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला आहे. परिणामी, कोरोना काळातील गुन्हेगारीने पोलिसांची डोकेदुखी वाढविली आहे.
गुन्हेगारी क्षेत्रात आले नवे चेहरे
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत लातूरच्या गुन्हेगारीचा आलेख कमी आहे. मात्र कोरोनाने गुन्हेगारीत नवे चेहरे दाखल झाले आहेत.
नव्या गुन्हेगारांचे रेकॉर्ड आणि तपशील ठेवण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे.
गुन्हेगारीत नवीन चेहरे आल्याने पोलिसांचीही चिंता वाढली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत माहिती संकलित केली जात आहे.
जिल्ह्यात घटना घडल्यास त्यावर तातडीने कारवाई केली जाते. गुन्हेगाराला अटक करण्याची प्रक्रियाही केली जाते. यातून पुढील होणारे परिणाम रोखण्यासाठी पोलीस प्रयत्न करतात. तपासाची गती वाढविल्याने अनेक गुन्ह्यांतील गुन्हेगार २४ तासांच्या आत गळाला लागतात. -निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक, लातूर
कोरोनाने आर्थिक गणित बिघडले आहे. यातून कुटुंबात मानसिक ताणतणाव वाढला आहे. अनेकांचा हक्काचा रोजगार गेल्याने प्रपंचाचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्योग आणि व्यवसायही डबघाईला आल्याने मानसिक त्रास अनेकांना सहन करावा लागतो. अशावेळी समुपदेशनासह आधाराची गरज आहे. - डॉ. ओमप्रकाश कदम
खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार
जिल्ह्यातील गुन्हेगारीचा टक्का समोर ठेवून पोलिसांना आता खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांच्या तपासात खबऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. यातून गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते.