चापोली : चाकूर तालुक्यातील चापोली परिसरात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा असून कृषी विभागाने राबविलेल्या उगवण क्षमता तपासणी मोहिमेमुळे यंदा या भागातून सोयाबीन बियाणे न उगवल्याची एकही तक्रार प्राप्त झाली नाही. दरम्यान, पिके बहरली असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
कृषी विभागाच्यावतीने खरीप हंगामपूर्व सोयाबीन बीज उगवण क्षमता तपासणी करण्याची तसेच घरगुती बियाणे वापराण्याची जनजागृती करून मोहीम राबविण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेतल्याने यंदा या भागातून बियाणे उगवले नसल्याची एकही तक्रार तालुका कृषी कार्यालयाला प्राप्त झाली नाही.
गेल्या वर्षी या परिसरातील शेतकऱ्यांना बियाणे न उगवण्याच्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे दुबार, तिबार पेरणी करावी लागली होती. यावर्षी कृषी विभागाकडून आवश्यक ती दक्षता घेण्यात येऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पेरणीपूर्व बियाणे उगवण चाचणी करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. शेतकऱ्यांनीही आवश्यक ती खबरदारी घेतल्याने बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी निरंक आहेत.
नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित...
गतवर्षी चापोली परिसरातील ४५ शेतकऱ्यांना नुकसानाची झळ सोसावी लागली. बियाणे न उगवल्याबाबत तक्रारी करुनही शासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे हे शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरले. त्यामुळे सोयाबीनचे पीक जोमात असल्याचे चित्र आहे.
जनजागृतीचा परिणाम...
गतवर्षी बियाणे न उगवल्यासंबंधी तक्रारी होत्या. त्यामुळे यंदा खरीप हंगामपूर्वी शेतकऱ्यांना बियाणे उगवण प्रात्यक्षिक करून घेण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. या मोहिमेमुळे बियाणे न उगवण्याबाबतच्या तक्रारी आल्या नाहीत. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यात कृषी विभागाला यश आले.
- पी.बी. गिरी, कृषी सहायक.