डीएड, बीएड अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांनाही देता येणार टीईटी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:21 IST2021-08-29T04:21:22+5:302021-08-29T04:21:22+5:30
लातूर : शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी देण्यापासून यावर्षी परीक्षा परिषदेने डीएड आणि बीएडच्या विद्यार्थ्यांना ...

डीएड, बीएड अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांनाही देता येणार टीईटी !
लातूर : शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी देण्यापासून यावर्षी परीक्षा परिषदेने डीएड आणि बीएडच्या विद्यार्थ्यांना वंचित ठेवले होते. आता शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला असून, टीईटीचे अर्ज भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत शिक्षण विभागाच्यावतीने परीक्षा परिषदेला सूचित करण्यात आले आहे. दरम्यान, डीएड, बीएड अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांनाही टीईटी देता येणार असल्याने या निर्णयाचे विद्यार्थ्यांमधून स्वागत होत आहे.
राज्य परीक्षा परिषदेने १० ऑक्टाेबर रोजी टीईटी परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी ३ ऑगस्टपासून अर्जप्रक्रिया सुरु झाली असून, केवळ डीएड आणि बीएडच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येतील, अशा सुचना होत्या. त्यामुळे अंतिम वर्षांचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार होते. दरम्यान, या निर्णयात बदल करण्यात आला असून, अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे.
५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार...
टीईटी परीक्षेकरिता ३ ते २५ ऑगस्टपर्यंत अर्ज भरायची मुदत होती. मात्र, यावर्षी डीएड, बीएडच्या अंतिम वर्षांचे निकाल या काळात लागण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे हे विद्यार्थी अर्जापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने ५ सप्टेंबरपर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यात डीएडच्या अंतिम वर्षांतील विद्यार्थी - १२००
जिल्ह्यात बीएडच्या अंतिम वर्षांतील विद्यार्थी - २१००
विद्यार्थी म्हणतात...
टीईटी देण्यासाठी डीएड, बीएड उत्तीर्ण होण्याच्या निर्णयात बदल करण्यात आला आहे. आता अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना टीईटी देता येणार आहे. हा चांगला निर्णय असून, विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. शिक्षण विभागाने मुदतवाढही दिली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी अर्ज भरतील. - संदीप कांबळे
डीएड, बीएडच्या अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांना टीईटी देता येणार आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. अनेक दिवसांपासुन शिक्षकभरतीची प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे परीक्षेबाबत जसा निर्णय घेतला तसा भरतीबाबतही लवकर निर्णय घेण्याची गरज आहे. - महेश चौगुले