लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : कोरोनामुळे यंदाच्या वर्षात शालेय स्पर्धा झाल्या नाहीत. त्यातच संघटनेच्या वतीने आयोजित होणाऱ्या स्पर्धा काही खेळांच्या झाल्या, तर काही खेळांच्या झाल्या नाहीत. या सर्व घडामोडींत यंदाच्या वर्षात क्रीडा ग्रेस गुण मिळणार की नाही, अशा संभ्रमात दहावी-बारावीचे खेळाडू विद्यार्थी आहेत.
राज्य शासनाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार क्रीडा ग्रेस गुण मिळतात. मैदानावर घालविलेल्या वेळामुळे अभ्यासावर परिणाम होत असल्याने तसेच क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी शासनाामार्फत क्रीडा ग्रेस गुण देण्याची योजना आहे. मात्र यंदाच्या वर्षात स्पर्धाच न झाल्याने दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांना ग्रेस गुण मिळणार की नाही, असा प्रश्न आहे. त्यातच विविध क्रीडा संघटना व राज्य क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने शासनाला यंदाच्या वर्षात सरसकट खेळाडूंना क्रीडा ग्रेस गुण देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात मात्र यंदाच्या वर्षात एकही प्रस्ताव नाही.
गतवर्षात आम्ही राज्यस्तरापर्यंत धडक मारली होती. यंदाच्या वर्षात स्पर्धाच न झाल्याने संभ्रम आहे. शासनाने मागील दोन वर्षातील कामगिरीचा विचार करून आम्हाला क्रीडा ग्रेस गुण द्यावेत. जेणेकरून पुढील शिक्षणासाठी ते आम्हास उपयोगी पडेल.
- अक्षरा पाटील, खेळाडू दहावी
यंदाच्या वर्षात ऑनलाईन शिक्षणावरच भर देण्यात आला आहे. त्यामुळे म्हणावा तसा अभ्यास झाला नाही. खेळाडू असल्या कारणाने खेळाचे गुण मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र यंदाच्या वर्षात गुण मिळतात की नाही, हा प्रश्न आहे. यावर तोडगा काढावा.
- मनस्वी क्षीरसागर, खेळाडू दहावी