सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:22 IST2021-08-15T04:22:35+5:302021-08-15T04:22:35+5:30
लातूर : शेतकऱ्यांना कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही चांगला पाऊस होण्याची अपेक्षा होती. ...

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?
लातूर : शेतकऱ्यांना कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही चांगला पाऊस होण्याची अपेक्षा होती. प्रारंभी पावसाने हजेरीही लावली. पेरणीनंतर महिनाभराने उघडीप दिलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धडकी भरविली. जवळपास महिनाभरापासून पाऊस नसल्याने जोमात आलेली पिके कोमेजली आहेत. चातक पक्षाप्रमाणे शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. अनेकजण ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय’ असे म्हणत साकडे घालत आहेत.
जिल्ह्यात ६ लाख १२ हजार ४२१ हेक्टर प्रस्तावित क्षेत्र असून, यापैकी ५ लाख ८१ हजार ४४३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. यामध्ये सोयाबीनचा सर्वाधिक ४ लाख ५६ हजार ६७८ हेक्टर, तूर ८० हजार, ज्वारी ११ हजार ४९४, कापूस ५ हजार ९४० तर ३ हजार ५४६ हेक्टरवर मकाची पेरणी झाली आहे. पेरणीच्या प्रारंभी आणि नंतर समाधानकारक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिके जोमात होती. मात्र, गेल्या महिनाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतशिवारातील पिके कोमेजू लागली आहे. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून, पावसाची प्रतीक्षा आहे.
मि.मी. आतापर्यंत अपेक्षित पाऊस -
मि.मी. प्रत्यक्ष झालेला पाऊस -
शेतकरी प्रतिक्रिया...
उसनवारी करून सोयाबीनची पेरणी केली. सुरुवातीला पाऊस असल्याने पीकही जोमात होते. मात्र, महिनाभरापासून पाऊस नसल्याने पिके हातातून गेली आहे. आतापर्यंत झालेला खर्चही वाया जाणार आहे. - विनोद कदम, शेतकरी
पावसाने उघडीप दिल्याने स्प्रिंकलरद्वारे पीक जगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्युत डीपी जळाल्याने पाणीही देता येत नाही. यावर्षी चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र, पाऊस नसल्याने पिके कोमेजू लागली आहेत.
जिल्ह्यात सोयाबीन प्रमुख पीक आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरिपातील पिके सुकून चालली आहे. त्यामुळे पिकांच्या नुकसानीबाबत सर्वेक्षण करण्याच्या सूचना पीक विमा कंपन्यांना दिल्या आहेत. त्यानुसार कारवाई केली जाईल. - दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
पेरणी वाया जाण्याची शक्यता...
सोयाबीन - ४,५६,६७८
तूर - ८०,०००
हरभरा - ११,४९४
कापूस - ५,९४०
मका - ३,५४६