खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे शेतकरी बी- बियाणे, खतांची जुळवाजुळव करीत आहेत. दरम्यान, गुरुवारी सकाळी शहर व परिसरात सोयाबीन बियाणांचा तुटवडा असून नामांकित कंपनीचे बियाणे उपलब्ध नसल्याचे कृषी सेवा केंद्र चालक सांगत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्याकडे मांडल्या. तसेच बाजारपेठेत महाबीजचे बियाणे येऊनही बहुतांश ठिकाणी उपलब्ध नसल्याचे फलक लागले असल्याचे सांगितले. त्यामुळे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी दुपारी शेतकऱ्यांचा वेश परिधान करून कृषी सेवा केंद्रात जाऊन खते, बियाणांची माहिती घेतली. विशेष म्हणजे, दुकानदारांना अगदी ग्रामीण भाषेत बियाणासंदर्भात विचारणा केली. तसेच भावासंदर्भात माहिती घेतली. तेव्हा सर्व कृषी सेवा केंद्र चालकांनी त्यांच्याकडील उपलब्ध साठ्याची आणि किमतीची माहिती दिली.
दरम्यान, काही तासाने व्यापाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्यांनीही तहसीलदार कुलकर्णी यांचे कौतुक केले. ज्यादा दराने बियाणे व खतांची विक्री होणार नसल्याचे महसूल प्रशासनाने सांगितले. तहसीलदारांच्या या उपक्रमामुळे कौतुक होत आहे.