गृहविलगीकरणातील बाधितांवर शिक्षकांचे राहणार लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:20 IST2021-04-09T04:20:20+5:302021-04-09T04:20:20+5:30
अहमदपूर : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, ६०७ बाधित रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती ...

गृहविलगीकरणातील बाधितांवर शिक्षकांचे राहणार लक्ष
अहमदपूर : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, ६०७ बाधित रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दररोज त्यांच्याकडून बाधितांची लक्षणे, ठिकाण व आजारपणाबाबत चौकशी केली जात आहे.
अहमदपूर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असून, गुरुवारी ११६ पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे गृहविलगीकरणातील बाधितांची संख्या ६०७ वर पोहोचली आहे. गृहविलगीकरणातील रुग्णांचे समुपदेशन केले जात असून, त्यासाठी शिक्षकांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून दररोज सकाळी व संध्याकाळी दोनदा सर्व रुग्णांच्या प्रकृतीची विचारणा केली जात आहे. तसेच त्यांच्या ठिकाणाविषयी माहिती संकलित केली जात आहे. प्रत्येक पथकात एक महिला व एक पुरुष आहे. दरम्यान, काही बाधितांचा संपर्क क्रमांक व पत्ता चुकीचा असल्याने त्याची माहिती घेतली जात आहे.
गृहविलगीकरणातील बाधित बाहेर फिरण्याचे प्रमाण अजूनही असून, बुधवारी पालिकेमध्ये दोन पॉझिटिव्ह रुग्ण गृहविलगीकरणात राहण्यासाठी परवानगी मिळविण्याकरिता स्वतः आले होते. मात्र त्यांना त्वरित कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले. गृहविलगीकरणातील १८ बाधितांचा अद्याप पत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांची यादी पोलीस ठाण्याकडे देण्यात आली असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक कार्यरत करण्यात आले आहे. दरम्यान, असे प्रकार पुढे घडू नयेत, म्हणून चाचणीवेळी त्यांचा पूर्ण पत्ता व दोन मोबाईल क्रमांक घ्यावेत, अशा सूचना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दासरे यांनी केल्या आहेत.
चाचणीसाठी लागल्या रांगा...
तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असून, बाधितांची संख्या ६८३ वर पोहोचली आहे. तसेच गृहविलगीकरणात ६०७ जण असून, बाहेरील रुग्णालयात दाखल असलेल्यांची संख्या १२ आहे. त्यांच्या संपर्कातील प्रत्येकाची चाचणी करण्यात येत असून, त्यासाठी रॅपिड टेस्ट करण्यात येत आहेत. गुरुवारी अहमदपूर येथे १०० रॅपिड व १५० आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यासाठी ग्रामीण रुग्णालयात रांगा होत्या, असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रेय बिराजदार यांनी सांगितले.