वृद्ध आईचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाला मिळाला धडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:18 IST2021-03-07T04:18:11+5:302021-03-07T04:18:11+5:30
जळाकाेट तालुक्यातील धामणगाव येथील वृद्ध महिला भगीरथी माधव हावा वय ८० यांचा मुलगा प्रल्हाद हा गंगाखेड तालुक्यातील हकेवाडी येथे ...

वृद्ध आईचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाला मिळाला धडा
जळाकाेट तालुक्यातील धामणगाव येथील वृद्ध महिला भगीरथी माधव हावा वय ८० यांचा मुलगा प्रल्हाद हा गंगाखेड तालुक्यातील हकेवाडी येथे शिक्षक आहे. नाेकरी लागल्यापासून आपल्या वृद्ध आईला त्याने एक रुपयाची मदत केली नाही, शिवाय तिच्या प्रपंचाकडे लक्ष दिले नाही. आईने जमेल तशी माेलमजुरी करून वयाच्या ८० वर्षांपर्यंत उदरनिर्वाह चालविला. आता वृद्धापकाळात माेलमजुरी करण्याची परिस्थिती राहिली नाही. परिणामी, आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी कोणताच आधार उरला नाही. मुलाला आईने अनेकदा आपल्या प्रपंचासाठी मदत करण्याची विनवणी केली. मात्र, आईच्या मागणीकडे, बाेलण्याकडे शिक्षक मुलाने लक्षच दिले नाही. अखेर जगणेच कठीण झालेल्या आईने मुलाविराेधात संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचीही त्यांनी भेट घेऊन चर्चा केली. शेवटी गंगाखेड पंचायत समितीचे सभापती, गटविकास अधिकाऱ्यांना भेटून आपली व्यथा मांडली. गंगाखेड पंचायत समितीच्या सभापती छाया मुंडे यांनी क्षणाचा विंलब न लावता पंचायत समितीची बैठक घेतली. या बैठकीत सदस्यांनी एकमताने ठराव मांडला. सदर शिक्षक प्रल्हाद हावा यांच्या वेतनातून ३० टक्के रक्कम आईच्या नावाने कपात करण्याचे आदेश दिले आहेत. ८० वर्षांच्या आईला जगण्यासाठी एका शिक्षक मुलासाेबत संघर्ष करून जगण्यासाठी धडपड करावी लागते, ही बाब सामान्यालाही लाजवणारी आहे. लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षकांच्या वेतनातून ३० टक्के रक्कम कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, असाच निर्णय महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेने घेतला, तर आशा वृद्ध माता-पित्यांना मुलासाेबत असा संघर्ष करावा लागणार नाही.