भाड्याच्या इमारतीतील तालुका कृषी कार्यालय समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:23 IST2021-09-24T04:23:40+5:302021-09-24T04:23:40+5:30

अहमदपूर : तालुक्याचे ठिकाण असलेल्या अहमदपूर येथील काही कार्यालये आजही भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. त्यामुळे अधिकारी- कर्मचाऱ्यांसह विविध कामानिमित्त ...

The taluka agriculture office in the rented building is in trouble | भाड्याच्या इमारतीतील तालुका कृषी कार्यालय समस्यांच्या विळख्यात

भाड्याच्या इमारतीतील तालुका कृषी कार्यालय समस्यांच्या विळख्यात

अहमदपूर : तालुक्याचे ठिकाण असलेल्या अहमदपूर येथील काही कार्यालये आजही भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. त्यामुळे अधिकारी- कर्मचाऱ्यांसह विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांना सामाेरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, येथील तालुका कृषी कार्यालय विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहे.

अहमदपूर तालुक्यात एकूण १२४ गावे, वाड्या, तांडे आहेत. शासनाच्या कृषिसंदर्भातील योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तालुका कृषी कार्यालय दुवा म्हणून काम करीत आहे. मात्र, येथील तालुका कृषी कार्यालयासाठी अद्यापही हक्काची इमारत नाही. त्यामुळे भाड्याच्या छोट्याशा जागेत कार्यालय आहे. विशेष म्हणजे, तालुका कृषी कार्यालयासह रजिस्ट्री कार्यालय, दुय्यम निबंधक, कृषी विभागाचे मंडळ कार्यालय, वनीकरण कार्यालयासाठी स्वतंत्र इमारती नाहीत. ही सर्व कार्यालये भाड्याच्या इमारतीत आहेत.

वनीकरणचे कार्यालय हे शहरातील गायकवाड कॉलनीतील एका भाड्याच्या घरात आहे. तिथे काही काम असल्यास नागरिकांना कार्यालयाचा शोध घ्यावा लागत आहे, तसेच तालुका कृषी कार्यालयही पूर्वी शिक्षक कॉलनीतील भाड्याच्या घरात होते; पण जागा अपुरी पडत असल्याने हे कार्यालय दुसरीकडे हलविण्यात आले. सध्या हे कार्यालय नांदेड रोडवरील भाड्याच्या इमारतीत आहे.

येथील कृषी कार्यालयाला हक्काची जागा नसल्याने छोट्याशा खोलीतून कारभार चालवावा लागत आहे. त्यामुळे नवीन इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

अहमदपूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने शहरासह ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांची नेहमीच कृषी कार्यालयात गर्दी असते. त्यामुळे बहुतांश वेळा शेतकऱ्यांना रस्त्यावर थांबावे लागत आहे. कृषी कार्यालयास अपुरी जागा असल्यामुळे ही समस्या आहे, तसेच वाहनतळाची व्यवस्था नसल्याने वाहतुकीस अडथळा होतो. वाहने मुख्य रस्त्यावर उभी करावी लागत आहेत. याशिवाय, कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची, शौचालयाची व्यवस्था नाही. त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.

प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू...

संबंधित विभागाकडे शासकीय जागेत अथवा प्रशासकीय इमारतीत कृषी कार्यालयाला जागा मिळावी म्हणून पाठपुरावा करण्यात येणार आहे. प्रशासकीय इमारतीत कृषी कार्यालयासाठी जागा मिळाली, तर शासनाचे भाडे वाचणार आहे आणि शेतकऱ्यांची अडचण दूर होणार आहे.

-संजय नाबदे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी

तहसील परिसरात जागा द्यावी...

तहसील कार्यालयाच्या परिसरात कृषी कार्यालयाला जागा मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची सोय होईल. तहसील कार्यालयाच्या परिसरात सध्या जागा आहे. त्या रिकाम्या जागेचा वापर शासनाने इतर कार्यालयांसाठी केला, तर ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना सोयीचे होईल, असे शिवकुमार उटगे म्हणाले.

Web Title: The taluka agriculture office in the rented building is in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.