सुरक्षेची काळजी घेत शववाहिका चालकांचा सेवेचा यज्ञ अविरत सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:20 IST2021-04-27T04:20:23+5:302021-04-27T04:20:23+5:30
लातूर : जिल्ह्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून दररोज पंधरा ते वीस कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी दवाखान्यातून ...

सुरक्षेची काळजी घेत शववाहिका चालकांचा सेवेचा यज्ञ अविरत सुरूच
लातूर : जिल्ह्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून दररोज पंधरा ते वीस कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी दवाखान्यातून स्मशानभूमीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शववाहिका चालकांवर आहे. दवाखाना ते स्मशानभूमीपर्यंतचा दररोजचा प्रवास मृतदेहाबरोबर असून, शहरात ६ शववाहिका चालकांचे हे कार्य विनाविश्रांती चालू आहे.
महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने या शववाहिका चालकांना सुरक्षेची सर्व साधने पुरविण्यात आली आहेत. साथ आजाराच्या प्रारंभी या चालकांमध्ये कोरोनाची लागण होईल याची भीती होती. मात्र, आता भीती दूर झाली आहे. जवळचे नातेवाईक, आप्तेष्ट मृतदेहापाशी येत नाही; परंतु शववाहिका चालकांचा दररोजचा मृतदेहांसोबत प्रवास आहे. रुग्णांना वाचविण्यासाठी डाॅक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु दुर्दैवाने मृत्यू झाल्यावर अंत्यसंस्कारासाठी आम्ही सेवा देत असल्याचे चालक म्हणाले.
कोरोनाच्या प्रारंभी दवाखान्यातून स्मशानभूमीमध्ये मृतदेह घेऊन जाताना भीती वाटत होती; परंतु आता भीती दूर झालेली आहे. मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, हातमोजे आदी साहित्य महानगरपालिकेने उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा वापर करून स्मशानभूमीत आम्ही मृतदेह घेऊन अंत्यसंस्कारासाठी जातो. सर्व सोयी असल्यामुळे भीतीचे कारण नाही. दुर्दैवाने मृत्यू होत आहेत. याची खंत आहे.
- राजकुमार सोंत, चालक
अंत्यसंस्कार करण्यासाठी आठ-दहा लोकांची टीम आहे. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह दवाखान्यातून घेऊन जाताना आम्हाला या रोगाची लागण होईल, याची भीती वाटत नाही. कारण आमच्या अधिकारीवर्गाकडून काळजी घेण्याबाबतच्या सूचना केल्या जातात. त्या सूचनांचे पालन करून आम्ही मृतदेह घेऊन जातो. सर्व साहित्य ते पुरवितात. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करणाऱ्यांच्या स्वाधीन केले जातात.
- मनोज कदम, चालक
महानगरपालिकेचे डाॅक्टर्स, अधिकाऱ्यांनी आम्हा चालकांना सॅनिटायझर, पीपीई किट, मास्क, ग्लोव्हज आदी सर्व साहित्य दिलेले आहेत. पूर्वी तीन-चार मृतदेह असायचे; परंतु आता गेल्या सात-आठ दिवसांपासून दहा, पंधरा मृतदेह घेऊन जातो. दवाखान्यातून स्मशानभूमीपर्यंत नेण्याची जबाबदारी आहे. अंत्यसंस्कार करणाऱ्या टीमच्या हाती सन्मानपूर्वक मृतदेह दिल्यानंतर तेथे अंत्यसंस्कार होतात. आमच्या हातून हे पुण्याचे काम घडत आहे. त्यात भीती कसली.
- सुनील कांबळे, चालक.