महामार्गाच्या पुलाचे सर्वेक्षण सुरू, लवकरच होणार कामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:19 IST2021-04-02T04:19:14+5:302021-04-02T04:19:14+5:30
अहमदपूर : राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ चे प्रलंबित काम सुरू झाले असून महामार्गावरील पुलाच्या जागा व माती परीक्षणाचे काम ...

महामार्गाच्या पुलाचे सर्वेक्षण सुरू, लवकरच होणार कामास प्रारंभ
अहमदपूर : राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ चे प्रलंबित काम सुरू झाले असून महामार्गावरील पुलाच्या जागा व माती परीक्षणाचे काम सुरु आहे. तसेच अहमदपूर रिंग रोड व मरशिवणीच्या भूसंपादनाचा मावेजा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ हा अहमदपूर व चाकूर तालुक्यातून जाणारा प्रमुख मार्ग असून लोहा ते चाकूर व चाकूर ते औसा अशा दोन टप्प्यांमध्ये सदरील महामार्गाचे काम चालू होणार आहे. त्यासाठी गुत्तेदाराने माती परीक्षण व ज्या ठिकाणी पूल निर्माण करायचे आहेत, तेथील मातीच्या सर्वेक्षणास सुरुवात केली आहे. हा सर्व्हे एक महिन्यात पूर्ण होणार असून एप्रिलअखेर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. हे काम २४ महिन्यांत पूर्ण होणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणने सांगितले.
तसेच अहमदपूर शहरातून जाणाऱ्या रिंग रोडसाठी १४३ शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या असून १२७ शेतकऱ्यांची सुनावणी पूर्ण झाली आहे. सदरील भूसंपादनासंबंधी ३ ए व ३ डी नंतर मावेजाची परिगणना होऊन एक महिन्यात मावेजा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मरशिवणी येथे १२३ हेक्टर भूसंपादन करण्यात आले असून त्यातील ६८ शेतकऱ्यांना मावेजा पंधरा दिवसांत मिळणार आहे.
लोहा ते चाकूर, चाकूर ते औसा या महामार्गावरील भूसंपादनाचे ९८ टक्के काम पूर्ण झाले असून केवळ २ टक्के काम शिल्लक आहे. औसा- चाकूर या महामार्गाच्या कामासाठी ९०० कोटींचा खर्च होणार असून त्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. चाकूर ते लोहा या ७४ किमीसाठी १०७१ कोटी व लोहा ते वारंगा या ५६ किमीसाठी १ हजार कोटीचा खर्च असून ते काम गुत्तेदारास देण्यात आले आहे. यात रस्त्याचे चौपदरीकरण, पूल, बायपास, ओव्हर ब्रीज ही कामे आहेत. या कामाचा कालावधी २४ महिन्यांचा असून मार्च २०२३ मध्ये सदरील काम पूर्ण होणार आहे.
एप्रिलअखेरपर्यंत मावेजा...
अहमदपूर शहराबाहेरून जाणारा रिंग रोड तसेच काही सर्वे नंबरची लवादाकडे प्रकरणे पूर्ण झाली आहेत. अहमदपूर रिंग रोडची परिगणना चालू आहे. या शेतकऱ्यांचा मावेजा एप्रिल अखेरपर्यंत खात्यात जमा होणार असल्याचे उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी जीवन देसाई यांनी सांगितले.
माती परीक्षणाचे काम...
लोहा ते औसा मार्गावरील विविध ठिकाणचे पूल, बायपास या ठिकाणच्या मातीची काठिण्य पातळी तपासण्याचे सर्वेक्षण सुरू असून सर्वेक्षण संपताच एप्रिलअखेर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे, असे राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक सुनील पाटील यांनी सांगितले.
दोन्ही बाजूंनी सुरू होणार काम...
लोहा येथून व चाकूर येथून एकाच वेळी दोन्ही बाजूंचे काम सुरू होणार असून मरशिवणी या ठिकाणी प्लँटची जागा खरेदी केली असून तिथून कच्च्या मालाचा पुरवठा होणार आहे.