झाडा- झुडुपांनी वेढल्याने तिरू नदीचे पात्र अरुंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:15 IST2021-07-01T04:15:03+5:302021-07-01T04:15:03+5:30
हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी गावाजवळून वाहणाऱ्या तिरू नदी पात्रात गाळ व झाडी- झुडपे वाढली आहेत. त्यामुळे ...

झाडा- झुडुपांनी वेढल्याने तिरू नदीचे पात्र अरुंद
हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी गावाजवळून वाहणाऱ्या तिरू नदी पात्रात गाळ व झाडी- झुडपे वाढली आहेत. त्यामुळे नदीचे पात्र अरुंद झाले आहे. परिणामी, पावसाळ्यात पाणी साचण्याची भीती निर्माण झाला आहे.
हाळी हंडरगुळी गावाजवळून वाहणारी तिरू नदी पुढे चिमाचीवाडी येथील तिरू प्रकल्पाला जाऊन मिळते. हाळी हंडरगुळीसह परिसरातील हेर, वडगाव, शेळगाव, चिमाचीवाडी, मोरतळवाडी, बेळसांगवी, वाढवणा आदी शिवारातील शेतकऱ्यांना या नदीचा आधार आहे. तिरू नदी व प्रकल्पामुळे अनेकांची जमीन ओलिताखाली आहे. मात्र, हाळी हंडरगुळी गावाशेजारी असलेल्या नदीच्या पात्रात बऱ्याच ठिकाणी बेशरम, काटेरी झुडपे, गाजर गवत वाढले आहे. झुडपांचे झाडात रूपांतर होत आहे.
पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहात येणारा घनकचरा, टाकाऊ प्लास्टिक, कॅरिबॅग नदीपात्रातील झाडा- झुडपांना अडकतात. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाहत्या पाण्याला जागोजागी अडथळा निर्माण होण्यामुळे नदीपात्रात पाणी तुंबून नदी शेजारील वस्तीत पाणी शिरण्याची भीती असल्याने साफसफाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
पाणी येते गावापर्यंत...
दहा वर्षांपूर्वी तिरू प्रकल्पाच्या पाळूची उंची दीड मीटरने वाढविली. त्यामुळे प्रकल्प शंभर टक्के भरल्यास हाळी हंडरगुळी गावापर्यंत पाणी तुंबते. आठ वर्षांपूर्वी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असता हंडरगुळी गावातील नदीशेजारील परिसरात पाणी थांबले होते.