घरावरून गेलेल्या ३२ केव्हीच्या विद्युत लाईनसाठी अभियंत्याला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:34 IST2021-02-18T04:34:55+5:302021-02-18T04:34:55+5:30
गौर येथे वीस वर्षांपूर्वी ३२ केवी महावितरण कंपनीची लाईन गावातून गेली असल्यामुळे सुमारे पंचवीस कुटुंबांना धोका निर्माण झाला आहे ...

घरावरून गेलेल्या ३२ केव्हीच्या विद्युत लाईनसाठी अभियंत्याला घेराव
गौर येथे वीस वर्षांपूर्वी ३२ केवी महावितरण कंपनीची लाईन गावातून गेली असल्यामुळे सुमारे पंचवीस कुटुंबांना धोका निर्माण झाला आहे .अगदी माळवदावर खेळणाऱ्या किंवा वावरणाऱ्या नागरिकांना या लाईनचा मोठा त्रास होत असून महिलांनी आम्हाला माळवदावर कपडे वाळू घालणे, धान्य वाळवणे, पापड, कुरडया करण्यासाठी मोठा त्रास होत आहे, असे सांगितले. सदरील लाईन तात्काळ काढून घ्यावी या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून नागरिक महावितरण कार्यालयात खेटे घालत आहेत. मात्र कार्यालयाकडून कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याने बुधवारी गौरी येथील नागरिकांनी कार्यकारी अभियंता ढाकणे यांची भेट घेऊन निलंगा येथील कार्यालयात त्यांना घेराव घातला. यावेळी गोपाळ भोजने, बबलू भोजने, शत्रुघ्न खंदाडे, बालाजी घोडके, पांडुरंग गारकर, आनंत पवार, राम सूर्यवंशी, लहू सूर्यवंशी, प्रकाश पांचाळ, विठ्ठल पांचाळ, हबीब शेख, रानबा नोरखडे, शेषराव चव्हाण रतन कदम, अनंत घारोळ, रमेश कदम, नायक सावंत, ज्ञानोबा गायकवाड, नामदेव भोजने, विठ्ठल शिंदे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरिष्ठांना अहवाल देणार- अभियंता ढाकणे
यावेळी कार्यकारी अभियंता ढाकणे म्हणाले की, सदरील बाबीची आम्ही वरिष्ठांना लेखी स्वरूपात अहवाल सादर करून देऊ व लवकरात लवकर ग्रामस्थांची ही समस्या सोडवू असे म्हणाले. आज पर्यंत कोणताही धोका किंवा अपघात झाला नाही .मात्र यात काही नुकसान झाले किंबहुना एखाद्याचा जीव गेल्यानंतरच याची सोय करणार आहात काय असा सवाल यावेळी गोपाळ भोजणे यांनी महावितरण प्रशासनास केला.