पूरक पोषण आहारास खाद्यतेलाविना फोडणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:17 IST2021-05-30T04:17:21+5:302021-05-30T04:17:21+5:30
हरी मोकाशे, लातूर : खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे शासनाने काटकसर करीत पूरक पोषण आहारातील कोरड्या शिध्यात बदल केला आहे. त्यामुळे ...

पूरक पोषण आहारास खाद्यतेलाविना फोडणी !
हरी मोकाशे,
लातूर : खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे शासनाने काटकसर करीत पूरक पोषण आहारातील कोरड्या शिध्यात बदल केला आहे. त्यामुळे चार महिन्यापासून अर्धा किलो खाद्यतेलाऐवजी एक किलो साखर देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, हा बदल करताना प्रथिने, कॅलरीज तितक्याच प्रमाणात मिळत असल्या तरी फोडणीच दिली जात नसल्याने तोंडाची चव उडाली आहे.
६ महिने ते ३ वर्ष, ३ वर्ष ते ६ वर्ष, गरोदर आणि स्तनदा मातांचे आरोग्य शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त रहावे. बालकांना सकस आहार मिळावा आणि त्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने गेल्या काही वर्षांपासून एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत पूरक पोषण आहार दिला जात आहे. गेल्या वर्षीपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे गरोदर तसेच स्तनदा मातांबरोबर सदरील वयोगटातील बालकांनाही आता कोरडा शिधा दिला जात आहे. त्यात गहू, तांदुळ, मूगडाळ, हरभरा डाळ, मीठ, हळद, मिरची आणि गोडेतेलाचा समावेश होता.
गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली असून सध्या १७० रुपये प्रति किलोपर्यंत भाव पोहोचला आहे. दरम्यान, शासनाने पूरक पोषण आहारातील खाद्यतेलाऐवजी साखर देण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीस लाभार्थ्यांना एखाद- दुसरा महिना खाद्यतेलाऐवजी साखर मिळेल, असे वाटत होते. परंतु, चार महिन्यांपासून खाद्यतेल देणे बंद झाले आहे. त्यामुळे पोषण आहाराला फोडणी कशी द्यावी, असा सवाल लाभार्थ्यांसमोर निर्माण होत आहे.
जिल्ह्यात पावणेदोन लाख लाभार्थी...
पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकूण १ लाख ७५ हजार ३०५ लाभार्थी आहेत. त्यात ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील ६५ हजार ९८९, ३ वर्ष ते ६ महिने वयोगटातील ८१ हजार ९७९ बालके, १३ हजार ५९६ गरोदर माता आणि १३ हजार ७४१ स्तनदा माता आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीतही घरपोच कोरडा शिधा दिला जात आहे.
फोडणी द्यायची कशी?...
अंगणवाडीमार्फत आमच्या दोन बालकांना लॉकडाऊनच्या कालावधीतही घरपोच पूरक पोषण आहाराचे साहित्य मिळत आहे. परंतु, चार महिन्यांपासून खाद्यतेलाऐवजी साखर दिली जात आहे. परंतु, फोडणीसाठी तेलच आवश्यक आहे. सध्या खाद्यतेलाचे दर १७० रुपये प्रति किलो आहेत तर साखर ३६ रुपये प्रति किलो आहे. त्यामुळे फोडणी कशी द्यायची असा सवाल आहे.
- रंजना आवटे, पालक.
शासनाच्या निर्णयानुसार वाटप...
चार महिन्यापासून शासनाने खाद्यतेलाऐवजी साखर देण्याचा आदेश दिला असून त्यानुसार पोषण आहाराचे साहित्य उपलब्ध होत आहे. सदरील साहित्याचे व्यवस्थित वाटप होत आहे. आमच्याकडे काही लाभार्थ्यांनी ही समस्या मांडली.
- देवदत्त गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.