शिक्षण विभागाच्या अधीक्षकास संस्थाचालकाची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:14 IST2021-01-01T04:14:42+5:302021-01-01T04:14:42+5:30
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक वर्ग २ राजेंद्र ढाकणे यांनी तक्रारीत म्हटले आहे, बुुधवारी सकाळी कार्यालयात कामकाज करीत ...

शिक्षण विभागाच्या अधीक्षकास संस्थाचालकाची मारहाण
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक वर्ग २ राजेंद्र ढाकणे यांनी तक्रारीत म्हटले आहे, बुुधवारी सकाळी कार्यालयात कामकाज करीत असताना घोणसी येथील व्यंकटेश बहुद्देशीय संस्थेचे संस्थाचालक शिवाजी व्यंकटराव परगे हे अचानक आरडाओरड करीत माझ्या केबिनमध्ये घुसले. शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत अंगावर धावून आले. माझ्या दंडाला धक्का मारून खुर्चीसह खाली पाडले. यावेळी कार्यालयातील सहकाऱ्यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्यांनी अधिक गोंधळ सुरू केल्याने मला केबिनच्या बाहेर घेऊन गेले. यासंदर्भात प्रभारी शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांना हल्ल्याबाबतची माहिती दिली.
लातूर पंचायत समिती शालेय पोषण आहार अधीक्षक म्हणून कार्यरत असताना प्राथमिक शिक्षण विभागातील अधीक्षक वर्ग २ चा अतिरिक्त कारभार माझ्याकडे होता. त्यावेळी बोगस तुकड्याप्रकरणी अहवालाचे काम मी तत्कालीन अधीक्षक वेतन पथक (प्राथमिक), शिक्षणाधिकारी प्राथमिक असे एकत्रित काम केले. त्यावेळी संस्थाचालक शिवाजी परगे यांनी दबाव टाकून अनुकूल अहवालासाठी दबाव टाकला होता. त्यांच्या दबावाला न जुमानता अहवाल तयार केला. त्या अहवालावरून त्यांच्या संस्थांच्या बोगस तुकड्या शासनाने कायम विनाअनुदानित केल्या आहेत. तसेच शासनाने संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर गुन्हेही दाखल केले आहेत. त्यावेळी परगे यांनी मला बघून घेण्याची धमकी दिली होती. अनेकदा त्यांची खोटी कामे न केल्याने माझ्यावर राग धरून कार्यालयात घुसून हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संस्थाचालक शिवाजी परगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सुभाष शिनगारे करीत आहेत.