ग्राम बीजोत्पादन योजनेंतर्गत १५ गावांत बहरले उन्हाळी सोयाबीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:19 IST2021-04-10T04:19:04+5:302021-04-10T04:19:04+5:30
शिरूर अनंतपाळ : आगामी खरीप हंगामात सोयाबीनच्या बियाणांचा तुटवडा निर्माण होऊ नये. तालुक्यातील शेतकऱ्यांना तालुक्यातच बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी ...

ग्राम बीजोत्पादन योजनेंतर्गत १५ गावांत बहरले उन्हाळी सोयाबीन
शिरूर अनंतपाळ : आगामी खरीप हंगामात सोयाबीनच्या बियाणांचा तुटवडा निर्माण होऊ नये. तालुक्यातील शेतकऱ्यांना तालुक्यातच बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी येथील तालुका कृषी कार्यालयाने आतापासूनच तयारी केली आहे. ग्राम बीजोत्पादन योजनेंतर्गत शिरूर अनंतपाळ तालुक्यातील १५ गावांची निवड करण्यात येऊन सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. २५ हेक्टर्सवर उन्हाळी सोयाबीन चांगलेच बहरले आहे. त्यासाठी हेक्टरी ३ हजार ७५० रुपयांचे अनुदानही देण्यात येणार आहे.
गतवर्षी बाजारपेठेत सोयाबीन बियाणांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे काही कंपन्यांकडून निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाणांची विक्री झाली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणांचा फटका सहन करावा लागला. याबाबत येथील पोलीस ठाण्यात एका बियाणे कंपनीच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या पदरी निकृष्ट बियाणे पडू नये म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, कृषी अधिकारी शिवप्रसाद वलांडे, मंडळ कृषी अधिकारी बाळासाहेब गाढवे यांच्यासह प्रायोगिक तत्त्वावर आधारित पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक घेऊन ग्राम बीजोत्पादन योजना सक्षम करण्यासाठी एकंदर १५ गावांची निवड करून उन्हाळी सोयाबीन लागवड करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे विविध गावांतील शेतकऱ्यांनी २५ हेक्टर्समध्ये उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली असून, सध्या हे सोयाबीन चांगलेच बहरले आहे.
तालुक्यातील या गावांत पेरणी...
ग्राम बीजोत्पादन योजनेंतर्गत तालुक्यातील शिरुर अनंतपाळ, दैठणा, तुरुकवाडी, नागेवाडी, वांजरखेडा, गणेशवाडी, बिबराळ, साकोळ, येरोळ, अजनी (बु.), शेंद, अंकुलगा (राणी), तळेगाव (दे.) उजेड, सुमठाणा आदी १५ गावांची निवड करण्यात आली. २५ हेक्टर्समध्ये उन्हाळी सोयाबीन पीक घेतले जात आहे. बियाणे उत्पादनात शेतकरी स्वयंपूर्ण झाले तर उत्पादन खर्च कमी होऊन जास्तीत जास्त फायदा होतो. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी ही योजना प्रभावीपणे राबविली आहे.
एकरी दीड हजारांचे अनुदान...
ग्राम बीजोत्पादन योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे म्हणून शासनाकडून एकरी दीड हजारांचे अनुदान देण्यात येते. त्यामुळे एक हेक्टर सोयाबीनचा पेरा करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ हजार ७५० रुपयांचे अनुदान देण्यात येते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ग्राम बीजोत्पादनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी अधिकारी वलांडे यांनी केले आहे.
कॅप्शन :
ग्राम बीजोत्पादन योजनेंतर्गत सोयाबीन...
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उजेड येथील शेतकरी भाऊसाहेब चिरके यांच्या शेतात उन्हाळी सोयाबीन चांगलेच बहरले आहे.