त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:19 IST2021-03-26T04:19:47+5:302021-03-26T04:19:47+5:30
रेणापूर तालुक्यातील तळणी येथील एक १७ वर्षीय मुलगी रेणापूर येथे शिक्षणासाठी होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती महाविद्यालयात अधून- मधून जात ...

त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
रेणापूर तालुक्यातील तळणी येथील एक १७ वर्षीय मुलगी रेणापूर येथे शिक्षणासाठी होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती महाविद्यालयात अधून- मधून जात होती. दरम्यान, गावातील ईश्वर बाबू कन्हेरे हा माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला बोलत जा, असे म्हणत पाठलाग करीत हाेता. त्यामुळे सदरील मुलीने हा प्रकार घरातील मंडळींना सांगितला. तेव्हा मुलीच्या वडिलांनी व नातेवाइकांनी ईश्वर कन्हेरे यास समज देऊन मुलीला त्रास देऊ नको, असे सांगितले होते. दरम्यान, २४ मार्च रोजी मुलगी व तिची आई शेतीकाम करून सायंकाळी घराकडे येत होत्या. तेव्हा ईश्वर कन्हेरे व गावातील अन्य एक जण दोन दुचाकी घेऊन थांबले होते. तेव्हा मुलीने तिच्या आईला ईश्वर त्रास देतो, असे सांगितले. त्यावेळी मुलीच्या आईने ईश्वर कन्हेरे यास तू इकडे कशाला आलास, तुझे काय काम आहे, असे म्हटले. तेव्हा त्याने मी काहीही करेन. तुमचं तुम्ही बघा, असे म्हणून निघून गेला. रात्री पुन्हा त्यास समज देण्यात आली. तेव्हा त्याने धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, सदरील मुलीने पहाटेच्या वेळी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या जबाबावरून ईश्वर कन्हेरे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी ईश्वर कन्हेरे याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे यांनी दिली.