साखर उद्योगासमोर संकट, १०० लाख टन साखरेचे करायचे काय? - बी.बी. ठोंबरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 04:36 PM2018-09-06T16:36:19+5:302018-09-06T17:42:20+5:30

जगात सर्वाधिक साखर उत्पादन करणा-या ब्राझील देशाला मागे टाकून येणा-या वर्षात भारत जागतिक विक्रम प्रस्थापित करेल.  त्याचवेळी १०० लाख टन इतकी अतिरिक्त होणा-या साखरेचे करायचे काय, हा प्रश्न असून ऊस उत्पादक शेतकरी व साखर उद्योगासमोर संकट उभे राहणार आहे. 

Sugar industry in crisis? | साखर उद्योगासमोर संकट, १०० लाख टन साखरेचे करायचे काय? - बी.बी. ठोंबरे

साखर उद्योगासमोर संकट, १०० लाख टन साखरेचे करायचे काय? - बी.बी. ठोंबरे

- धर्मराज हल्लाळे
लातूर - जगात सर्वाधिक साखर उत्पादन करणा-या ब्राझील देशाला मागे टाकून येणा-या वर्षात भारत जागतिक विक्रम प्रस्थापित करेल.  त्याचवेळी १०० लाख टन इतकी अतिरिक्त होणा-या साखरेचे करायचे काय, हा प्रश्न असून ऊस उत्पादक शेतकरी व साखर उद्योगासमोर संकट उभे राहणार आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी कच्च्या साखरेचे उत्पादन करून आशियाई देशांना निर्यात व बी हेवी मोलासेसपासून थेट इथेनॉल निर्माण करणे हा जालीम उपाय असल्याचे वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष कृषिरत्न बी.बी. ठोंबरे यांनी सांगितले.
मागील दोन वर्षांचा ऊस व साखर उत्पादनाचा आढावा व अभ्यास नमूद करताना ठोंबरे यांनी म्हटले आहे, हंगाम २०१६-१७ मध्ये देशांतर्गत २०३ लाख टन साखर उत्पादन झाले़ २०१७-१८ मध्ये मोठी वाढ होऊन ते ३२० लाख टनावर गेले. एकट्या महाराष्ट्रात तर तब्बल अडीच पट म्हणजे १०७ लाख टन उत्पादन झाले होते. येणा-या गळीत हंगामात देशांतर्गत ३५५ लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे.  त्यामध्ये महाराष्ट्रात ११५ लाख टन उत्पादन होईल. म्हणजेच देशातील एकूण साखर खप लक्षात घेता १०५ लाख टन साखर शिल्लक राहील. यापूर्वी शासनाने त्यासाठी निर्यातीच्या योजना दिल्या़ परंतु, केवळ पाच लाख टन निर्यात झाली. अशा परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकरी व साखर उद्योगांसमोर संकट आहे, असेही ठोंबरे यांनी सांगितले. 
पुढील हंगामाचा साखर उत्पादन ताळेबंद कसा राहील, यासंदर्भाने बी.बी. ठोंबरे म्हणाले, हंगाम २०१८-१९ चा कॅरिओव्हर साठा १०० लाख टन, अपेक्षित उत्पादन ३५५ लाख टन, त्यातून २६५ लाख टन साखर वापर वजा करू शकतो. ज्यामध्ये हंगाम २०१९-२० साठी कॅरिओव्हर स्टॉक ९० लाख ठेवू शकतो़ म्हणजेच १०० लाख टन ही अतिरिक्त पांढरी साखर उत्पादित होईल.
 साखर उद्योगासमोरील हे संकट दूर करण्यासाठी उपाय कोणते, यावर ठोंबरे यांनी दोन पर्याय समोर ठेवले आहेत. ज्यामध्ये कच्ची साखर व पांढरी साखर. यापैकी पांढ-या साखरेला जागतिक बाजारात मागणी नाही. तुलनेने कच्च्या साखरेला आशियाई देशांत चांगली मागणी आहे. हे सर्व देश ब्राझीलमधून साखर आयात करतात. त्यापेक्षा भारताने विशेषत: महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या सागर किना-यावरील राज्यांनी कच्ची साखर निर्यात करावी़ कारखाना व बंदरापर्यंतचे अंतर कमी आहे. तसेच ब्राझीलपेक्षा भारताकडून साखर घेणे आशियाई देशांना परवडणारे आहे. त्यासाठी साखर कारख्यान्यांनी कच्ची साखर उत्पादित करावी़ निर्यातीसाठी सरकारने अनुदानाची रक्कम ५५ रूपये प्रति टन वाढवून ती १०० रूपये करावी़ ज्यामुळे ५५ ते ६० लाख टन कच्ची साखर निर्यात होईल. दुसरा उपाय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी व जैविक धोरणांतर्गत इथेनॉल निर्मितीला अधिक प्रोत्साहन दिले आहे.  त्याचाच एक भाग म्हणजे बी हेवी मोलासेसपासून बनणा-या इथेनॉलला पाच रुपये दर वाढवून दिला आहे. त्यामुळे बी हेवी मोलासेस इथेनॉलसाठी वापरल्या जाणाºया पांढºया साखरेचे उत्पादन दीड टक्क्याने कमी होईल. देशातील स्वत:ची डिस्टीलरी असलेल्या साखर कारखान्यांनी बी हेवी मोलासेसपासून इथेनॉल करावे. डिस्टीलरी नसलेल्यांनी इतरांना मोलासेस विकावे़ ज्यामुळे इथेनॉल उत्पादन वाढेल व ३० लाख टन साखर उत्पादन कमी होईल. ज्यामुळे अतिरिक्त १०० लाख टन साखरेचा प्रश्न ८५ लाख टनाने कमी होऊन भाव स्थिर राहतील व उत्पादकांना एफआरपीप्रमाणे बिल मिळणे शक्य होईल, असे नमूद करीत बी. बी. ठोंबरे यांनी शासन व साखर उद्योगाने अंमल करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले.

Web Title: Sugar industry in crisis?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.