घागरभर पाण्यासाठी वणवण; लातूर जिल्ह्यात २५४ गावांत पाणीटंचाईची दाहकता वाढली

By हरी मोकाशे | Published: March 27, 2024 06:42 PM2024-03-27T18:42:33+5:302024-03-27T18:45:49+5:30

९८ गावांना ११० अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा

struggle for water; In Latur district, water scarcity has increased, 254 villages are thirsty | घागरभर पाण्यासाठी वणवण; लातूर जिल्ह्यात २५४ गावांत पाणीटंचाईची दाहकता वाढली

घागरभर पाण्यासाठी वणवण; लातूर जिल्ह्यात २५४ गावांत पाणीटंचाईची दाहकता वाढली

लातूर : वाढत्या उन्हाबरोबर जिल्ह्यात पाणीटंचाईचे चटके वाढत आहेत. त्यातच भूजल पातळी खालावल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना घागरभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सध्या जिल्ह्यातील २५४ गावे तहानेने व्याकूळ झाली आहेत. या गावांनी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करावा म्हणून पंचायत समितीकडे प्रस्तावही दाखल केला आहे. त्यापैकी ९८ गावांना ११० अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत अल्प पर्जन्यमान झाल्याने यंदा जिल्ह्यातील काही गावांना डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या. त्यामुळे पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखडे तयार करण्यात येऊन त्यास मंजुरी देण्यात आली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा रविराजाने मार्चमध्येच रौद्ररुप धारण केले आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. परिणामी, मध्यम, लघु प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा भूजल पातळी जवळपास २.१३ मीटरने खालावली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

निलंगा तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई...
तालुका - टंचाईग्रस्त गावे

लातूर - ३४
औसा - ३७
निलंगा - ४६
रेणापूर - २४
अहमदपूर - ३५
चाकूर - १२
शिरुर अनं. - ०५
उदगीर - १५
देवणी - ०३
जळकोट - ०६
एकूण - २१७

औश्यात सर्वाधिक अधिग्रहणाची मागणी...
जिल्ह्यातील २१७ गावे आणि ३७ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे या गाव व वाड्यांनी ३३३ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. त्यात सर्वाधिक अधिग्रहणाची मागणी औसा तालुक्यातून झालेली असून ८७ अशी संख्या आहे. त्यापाठोपाठ लातूर तालुक्यातील ३४ गावांची ५४, अहमदपुरातील ५१ गावे व वाड्यांची ५१ अधिग्रहणाची मागणी आहे.

९८ गावांची तहान ११० अधिग्रहणावर...
जिल्ह्यातील ७८ गावे आणि २० वाड्यांसाठी ११० अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. २५४ गावांचे ३३३ अधिग्रहणाचे प्रस्ताव असले तरी पाहणीअंती त्यातील २७ गावांचे ४० प्रस्ताव वगळण्यात आले आहेत. उर्वरित १७९ गावांचे २१३ अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.

जिल्ह्यात टँकर वाढले...
जिल्ह्यातील १८ गावे आणि एका वाडीने तीव्र पाणीटंचाईमुळे २० टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. त्यात लामजना, खरोसा, मोगरगा, टाका, तांबरवाडी/ राजेवाडी, कार्ला, टेंभूर्णी, फुलसेवाडी, येलदरा, शिवाजीनगर तांडा/ वाघमारी तांडा, मेवापूर, चिंचोली ब., महापूर, चिखुर्डा, साखरा, बाेरगाव (बु.), गुंफावाडी, लिंबाळा या गावांचा समावेश आहे. त्यापैकी लामजना, खरोसा, मोगरगा, टाका, तांबरवाडी, कार्ला, टेंभूर्णी या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

Web Title: struggle for water; In Latur district, water scarcity has increased, 254 villages are thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.